कोल्हापूर : मराठा लाईट इन्फंट्री ही शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन चालते. जेथे मराठा सैनिक तैनात असतो, तेथे शत्रू कायम घाबरत असतो. कारण कोणत्याही परिस्थितीत विजय मिळविण्याची क्षमता मराठा इन्फंट्रीमध्ये आहे, असे गौरवोद्गार लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी काढले.कोल्हापुरातील टेंबलाईवाडी येथील १०९ इन्फंट्री बटालियन (प्रादेशिक सेना) येथे बुधवारी भारतीय सेनेतर्फे माजी सैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याला उपस्थित राहण्यासाठी कोल्हापुरात आले असता, त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.रावत म्हणाले, मराठा लाईट इन्फंट्रीचा इतिहास मोठा आहे. या इन्फंट्रीला २५० वर्षे पूर्ण झाली आहेत. रणभूमीवरील इतिहासात असे एकही युद्ध नाही, जिथे ११४ मराठा रेजिमेंट लढला नाही. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी विजय मिळवूनच मराठा सैनिक परततात.पाकिस्तानमध्ये पंतप्रधान इम्रान खान यांची सत्ता आल्यामुळे भारतीय सैन्यदलाच्या धोरणांत काही विशेष बदल केला आहे काय, यावर रावत म्हणाले, सत्ता कोणाचीही व कोणतीही असली तरीही अतिरेकी त्यांच्या कारवाईत सतत बदल करत असतात. त्यानुसार आम्हीही सतत आमचीही व्हूहरचना बदलतो. अतिरेक्यांकडून ‘स्नायपर’ बंदुकीचा वापर झाल्याचे अजून स्पष्ट झालेले नाही तरीही आपल्याकडील एके-४७ सह अन्य अत्याधुनिक कॅमेरे असलेल्या बंदुकांसह आपण त्यांचा सामना करू शकतो.नक्षल्यांचे हल्ले वैफल्यातूनसततच्या कारवायांमुळेच नक्षली हतबल झाले आहेत. त्यांच्याकडून प्रसारमाध्यमांवर होणारे हल्ले वैफल्यातून होत असून केंद्रीय सशस्त्र दल तसेच निमलष्करी दल नक्षलींचा सामना करण्यास सक्षम आहेत, असेही लष्करप्रमुख रावत यांनी सांगितले.तसेच या वेळी त्यांनी माजी सैनिक, अधिकारी, वीरमाता व वीरपत्नी यांची आपुलकीने चौकशी केली तसेच त्यांच्या समस्या जाणून घेत, प्रश्न तत्काळ सोडविण्याच्या सूचनाही दिल्या.
मराठा सैनिक तैनात असतो, तिथला शत्रू घाबरतो; लष्करप्रमुखांची स्तुतिसुमनं
By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2018 5:06 AM