पुणे - Laxman Hake on Maratha ( Marathi News ) राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल हा शैक्षणिक आणि संशोधनात्मक असायला हवा होता. आताच्या राज्य मागासवर्गीय आयोगाचा सर्व्हे हा सुमार दर्जाचा आहे. कारण त्यांची प्रश्नावली आहे त्याचं उत्तर आर्थिक बेसवर केला जातंय. हा सर्व्हे मराठा समाजाची उत्तरपत्रिका द्यायची असा खोटा सर्व्हे आहे. याला कोर्टात चॅलेंज करू असं ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे.
लक्ष्मण हाके यांनी सांगितले की, खोटी माहिती भरून सर्व्हे केले जातायेत. खोटी माहिती कुणी दिली तर त्यांच्यावर कारवाईचे कुठलेही अधिकार राज्य मागासवर्गीय आयोगाला नाही. मग ही खोटी माहिती भरून एकाबाजूला प्रश्नपत्रिका आणि एका बाजूला उत्तरपत्रिका देतायेत. मग ९५, ९९ मार्क्स पडतील. मग त्यामुळे मूळ सामाजिक मागासलेल्या लोकांवर तुम्ही अन्याय करणार नाही का? राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाला आम्ही कोर्टात चॅलेंज करू. ही माहिती संशोधनात्मक नाही. ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा आरक्षण देणार होते. मग या अधिसूचनेनंतर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व पक्षांच्या प्रमुखांनी कशारितीने ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही हे समजवावे. या प्रकरणात सर्वपक्षीय बैठक बोलवावी आणि वातावरण बिघडणार याची काळजी घ्यावी असं त्यांनी सांगितले.
तसेच राज्य सरकारने जी अधिसूचना काढली त्यानंतर मी सोशल मीडियावर ओबीसी, विजे-एनटी, भटक्या विमुक्त जाती यांच्या हक्कासाठी प्रत्युत्तर दिले. संविधानिक आणि कार्यकर्ता म्हणून जे अनुभव आहेत ते मांडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शेकडो कॉल तुला बघून घेऊ, तू संभाजीनगरला ये, बीडला ये अशा धमक्यांचे आलेले आहेत. मी त्याविषयी पुणे आयुक्तांकडे तक्रार देतोय. आम्ही संविधानिक न्यायहक्कांची भाषा करत असू तर समोरुनही तसे विचार यावेत. वैचारिक चर्चा होणे अपेक्षित आहे. हा महाराष्ट्र म्हणजे बिहार नव्हे. फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. इथं आचार, विचार करावा लागतो. आता जी आंदोलन उभी राहतायेत, त्यांच्या नेतृ्त्वानं पुढे आले पाहिजे. त्या नेतृत्वाने काही गोष्टी बोलताना संविधानिक आणि राज्यातील सर्व समाजाला डोळ्यासमोर ठेऊन केली पाहिजे. मी बघून घेईन, मी छाताडावर नाचेन अशी विधाने एवढ्या मोठ्या समाजाचे नेतृत्व करताना आली तर निश्चित त्यावर क्रिया प्रतिक्रिया उमटणार आहेत. आम्ही संविधानिक, कायद्याबद्दल बोललो तर इतकं झोंबण्याचं कारण काय? असा सवालही लक्ष्मण हाकेंनी धमकी देणाऱ्यांना विचारला आहे.
दरम्यान, संजय गायकवाड हा सुमार दर्जाचा असून गुटखा किंग, मटका किंग असा प्रतिनिधी आहे. त्या विधानसभा मतदारसंघातील लोकांनी काय म्हणून निवडून दिला. कायद्याच्या सभागृहात तू आमदार आहे आणि तु कमरेखालची भाषा वापरतो. तू आमदार म्हणवून घ्यायच्या लायकीचा आहे का? लाखो लोकांचे तू प्रतिनिधीत्व करतो आणि जी व्यक्ती इथल्या ४०० जातींच्या न्याय हक्कांसाठी, संविधानिक बोलते. त्यांच्या अधिकाराबद्दल बोललाय तुम्हाला इतके झोंबते? गायकवाड यांनी लोकप्रतिनिधीला शोभेल अशी भाषा अपेक्षित आहे असा टोला हाकेंनी आमदार संजय गायकवाड यांना हाणला आहे. लक्ष्मण हाके हे राज्य मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य आहेत.