नाशिक - अहमदनगरच्या ओबीसी एल्गार मेळाव्यात मंत्री छगन भुजबळांनी केलेल्या एका विधानानंतर राज्यात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. नाभिक समाजाने मराठा समाजाची हजामत करू नये असं आवाहनच भुजबळांनी केले. मात्र या विधानावरून राज्यभरात मराठासह नाभिक समाजातील लोकांनीही विरोध दर्शवला. त्यानंतर आता यावर भुजबळांनी स्पष्टीकरण दिले आहे.
छगन भुजबळ म्हणाले की, अहमदनगर येथे झालेल्या ओबीसी भटक्या विमुक्त एल्गार मेळाव्यात नाभिक समाजाबद्दल केलेलं हे वक्तव्य हे एका बांधवाने त्याच्या गावातील केलेल्या तक्रारीमुळे केलेले आहे. हे वक्तव्य केवळ त्या गावापुरतेच मर्यादित आहे. त्यामुळे कुणीही या वक्तव्याचा विपर्यास करू नये. एका गावातील नाभिक समाजाच्या कार्यकर्त्याने ओबीसी आरक्षणाच्या समर्थनार्थ पोस्ट केली त्या नाभिक समाजाच्या व्यक्तीच्या दुकानात केस कापायला जायचं नाही अशी तिथल्या मराठा समाजाने भूमिका घेतली होती अशी बहिष्काराची भाषा जर कोणी करत असेल तर नाभिक बांधवांनी सुद्धा त्यांच्यावर बहिष्कार टाका असं आवाहन केले होते असं त्यांनी म्हटलं.
तसेच सभेत केलेलं हे वक्तव्य पूर्णतः त्या गावापुरते मर्यादित आहे. मात्र समाज माध्यमांवर या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. ही अतिशय चुकीची बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच अर्धवट क्लिप व्हायरल करून काही समाजकंटक हे नाभिक बांधवांमध्ये गैरसमज निर्माण करत असल्याने नाभिक बांधवांनी सुद्धा हे लक्षात घ्यावं असंही मंत्री भुजबळांनी आवाहन केले आहे.
१६ नोव्हेंबरलाच मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला
दरम्यान, मराठा आंदोलनाविरोधात मंत्री भुजबळ सातत्याने ओबीसी एल्गार मेळावे घेतायेत. त्यातून सरकारविरोधी भूमिका मांडतायेत त्यावर विरोधकांसह शिवसेनेतील काही आमदारांनी भुजबळांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी करत होते. त्यावर मंत्री भुजबळांनी अहमदनगरच्या मेळाव्यात गौप्यस्फोट केला. मी अशी भाषणे करतो, सरकारमधले, विरोधी पक्षातील सगळे बोलतात, तुम्ही राजीनामा द्या, हिंमत असेल तर राजीनामा द्या. माझ्या सरकारमधीलही नेते बोलतात. काल-परवा एकजण बडबडला. या भुजबळाला कमरेत लाथ घालून मंत्रिमंडळाला बाहेर हाकला असं म्हणाला. मला त्या सर्वांना विरोधी पक्ष, स्वपक्षातील, सरकारला सांगायचे आहे. १७ नोव्हेंबरला जालनातील अंबडला रॅली झाली. त्या रॅलीला जाण्यापूर्वी १६ नोव्हेंबरला मी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. त्यानंतर अंबडच्या सभेला रवाना झालो. लाथ मारण्याची मला गरज नाही. अडीच महिने मी शांत राहिलो, याची वाच्यता नको असं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. लाथ मारायची गरज नाही. मी शेवटपर्यंत ओबीसीसाठी लढणार आहे असं भुजबळांनी म्हटलं होते.