मुंबई : मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी २५ व २६ जुलै आणि ९ आॅगस्टला केलेल्या बंदच्या आंदोलनात ज्या निरपराध आंदोलकांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत, ते मागे घेण्यासाठी कार्यवाही करण्याचे आदेश गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी दिले आहेत. यासंदर्भात मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात त्यांची भेट घेतल्यानंतर केसरकर यांनी हे आदेश दिल्याची माहिती समन्वयक अनिल शिंदे यांनी दिली.शिंदे म्हणाले की, आंदोलनादरम्यान बहुतेक निरपराध आंदोलकांवर दंगल करणे, जाळपोळ करणे, पोलिसांवर हल्ले करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. यासंबंधात मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेतली. या वेळी मराठा समाजाच्या शिष्टमंडळात विजय भोसले, प्रफुल्ल पवार, अॅड. सुलक्षणा जगदाळे, डॉ. सुभाष कदम, दशरथ पाटील, स्वप्निल काटकर, विलास सुद्रीक व संदीप सावंत यांनी आंदोलकांची बाजू मांडली. या बैठकीत गृहखात्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था), आणि विधि व न्याय विभागाचे वकील उपस्थित होते. केसरकर यांनी या वेळी मराठा समन्वयकांच्या शिष्टमंडळाच्या सर्व मागण्या तत्त्वत: मान्य करून त्यासंदर्भात गुन्हे मागे घेण्याची कारवाई सुरू करण्याचे निर्देश पोलीस महासंचालकांना दिले.जे गुन्हे आम्ही केले नाहीत ते गुन्हे आमच्यावर दाखल करून आम्हा तरुणांवर गुन्हे कबूल करण्यासंदर्भात दबाव आणणे चुकीचे असल्याचे म्हणणे शिष्टमंडळातर्फे मांडण्यात आले. चौकशीअंती असे सर्व गुन्हे मागे घेण्याचे निर्देश केसरकर यांनी दिले. कोपरखैरणे येथे झालेल्या आंदोलनात बळी गेलेल्या रोहन तोडकर या मराठा तरुणाच्या मृत्यूच्या चौकशीचे निर्देशही त्यांनी दिले.
मराठा कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 6:44 AM