नागपूर : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र वाटून मराठ्यांचं ओबीसीकरण करणं चुकीचं असल्याचं सांगत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे आक्रमक झाले आहेत. मात्र असं असताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री राजेश टोपे यांनी मराठे हे मूळ कुणबीच असल्याचं सांगितलं आहे. विशेष म्हणजे राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात छगन भुजबळ यांच्यासमोर टोपे यांनी याबाबत आपली भूमिका मांडली आहे.
मराठा आरक्षणाबद्दल बोलताना राजेश टोपे म्हणाले की, "महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे, शाहू- फुले- आंबेडकर यांच्या विचारांनी चालणारे हे राज्य आहे. अशा या राज्यात समाजा- समाजामध्ये दरी निर्माण होऊ नये, सलोख्याने व गुणा- गोविंद्याने नांदण्याची वृत्ती त्यांच्यात असावी. या विचारांना समर्थन करत असताना ज्या काही समाजाच्या रास्त मागण्या आहेत, त्यांना शासनाने न्याय दिला पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण हे दिलेच पाहिजे; याबाबतीत कुणाचेच दुमत असण्याचे कारण नाही. शिवकालीन काळामध्ये ज्या लढाया होत होत्या, त्या काळात मर कर भी न हटनेवाला ओ मराठा है असा उल्लेख मराठा समाजाचा आहे. छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा या समाजाला आरक्षणासाठी सवलती दिल्या आहेत. आम्ही मराठवाडा भागातून येतो; हा विभाग निजाम राजवटीतील आहे. या राजवटीत मराठा समाजाला आरक्षण असायचेच, कुणबी व मराठे हे एकच आहे. १९५० साली घटनेतून SC आणि ST पुरते आरक्षण आपण दिले, त्यानंतर हे आरक्षण बंद झाले. १९६७ साली मागासवर्गीयांसाठी झालेल्या निर्णयामध्ये मराठा, कुणबी असा उल्लेख आहे, ज्यात मराठा समाज आहे. यानंतर घटना समितीचे सदस्य पंजाबराव देशमुख यांनी त्यांचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी घरोघरी प्रचार केल्यानंतर विदर्भात त्यांच्या नोंदण्या झाल्या आहेत व मराठवाडा त्यापासून वंचित राहिले. त्यांना आरक्षण मिळावे हिच तिथल्या जनतेची मागणी आहे," असं टोपे यांनी म्हटलं आहे.
"कुणबी व मराठा हे एकच, त्यादृष्टीने आरक्षण हवे"
मराठा आरक्षणाबद्दल पुढे बोलताना राजेश टोपे म्हणाले की, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समिती मार्फत हे प्रमाणपत्र शोधण्याची मोहीम जी सुरु आहे, त्यात २५ ते ३० लाख कुटुंबांच्या नोंदी या कुणबीमध्ये सापडल्या आहेत. कुणबी व मराठा हे एकच आहे त्या दृष्टीने आरक्षण असायला हवे. आरक्षणा संदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार केंद्राने राज्य सरकारला दिले आहे. सरकारने मागच्या त्रुटींची दुरुस्ती करावी. सुप्रीम कोर्टाच्या मागच्या निरीक्षणाचा अभ्यास सरकारने करावा आणि असा निकाल द्यावा की ते आरक्षण कोर्टात टिकले पाहिजे; त्या दृष्टीने सरकारने सकारात्मक पाऊले टाकायला हवे," अशी मागणी राजेश टोपे यांनी केली आहे.
दरम्यान, मराठा समाज कुणबी असल्याचं सांगत आरक्षणाची मागणी केल्याने राजेश टोपे यांचा आगामी काळात छगन भुजबळ यांच्याशी संघर्ष होण्याची शक्यता आहे. याबाबत नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.