अकोला, दि. १२- मराठा समाजाचे मोर्चे कौतुकास्पद आहेत. समाज विकासाच्या मागण्याही रास्त आहेत. मात्र, समाजाच्या या परिस्थितीला जबाबदार कोण, याचा शोध घेतल्यास स्वकियांविरोधातच लढा द्यावा लागणार आहे. त्यासाठी मराठा समाज तयार आहे का? असा प्रश्न उपस्थित करीत विषमतावाद्यांकडून समूहमन कलुषित करून मोर्चाच्या निमित्ताने भरकटवले जात आहे. या स्थितीत संयमाने मोर्चाची दिशा कायम ठेवण्याचे आवाहनही अँड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे केले. धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवानिमित्त भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने अकोल्यात आयोजित धम्म मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र दारोकार गुरुजी, तर मंचावर चैत्यभूमीचे व्यवस्थापक भन्ते बी. संघपाल यांच्यासह भारिप-बमसंचे पदाधिकारी उपस्थित होते. अँड आंबेडकर म्हणाले की, शेतीचे प्रश्न सुटायला हवेत. त्यासाठी यशवंतराव चव्हाण यांनी तयार केलेली बाजार समिती, पर्यायी बाजार व्यवस्था शेतकर्यांसाठी हिताची होती. आता ती ताब्यात असणार्यांनी शेतकर्यांच्या लुटीची व्यवस्था केली आहे. ही व्यवस्थाही बदलावी लागणार आहे. शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावापेक्षा कमी भावाने शेतमाल खरेदी करणार्यांविरोधात बाजार समितीने शेतकर्यांची तक्रार घ्यायला हवी. त्यामध्ये व्यापारी दोषी आढळल्यास त्याला किमान सात वर्ष शिक्षा आणि त्याची संपत्ती जप्त करण्याची मागणी मराठा समाजाने मोर्चात करावी, ती मान्य झाल्यास शेतकर्यांचे अर्धे दु:ख क्षणात नाहिसे होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यासाठी जुन्या मानसिकतेतून बाहेर यावे लागणार आहे. जातीसाठी माती खाण्याऐवजी समप्रश्नी लोकांसाठी लढण्याची तयारी करावी लागेल, असे ते म्हणाले. आरक्षणाच्या माध्यमातून विकास होईल, असे मानले तर अनेक जाती आरक्षण मागत आहेत. आरक्षणाच्या कमी जागांसाठी भांडणारांची संख्या वाढत आहे. त्यातून नोकरी, बेरोजगारीची समस्या संपूर्ण सुटणार आहे का, याचा विचारही व्हायला हवा. मराठा समाजाच्या मोर्चाने शासन कोंडीत सापडले आहे. ही वेळ साधली पाहिजे. त्याउलट जातीय दंगली भडकवून हाताला काहीच लागणार नाही. सरकारला जबाबदारीतून सुटण्याची संधी देऊ नका, समाजाचे दु:ख सरकार सोडवेल, असे नाही. त्यासाठी शासनाला मनुवाद सोडून मानवतावाद स्वीकारावा लागेल, ते शासनाला शक्य नाही. त्यासाठी शांतता आणि संयम ठेवा, समूहातील संवाद कायम ठेवा, भिंती उभारणार्यांना ओळखा, असेही अँड. आंबेडकर म्हणाले.
मराठय़ांना स्वकियांविरोधातच लढावे लागेल !
By admin | Published: October 13, 2016 3:16 AM