मुंबई - मुंबई व महाराष्ट्राच्या अस्मितेला शिव्याशाप देणाऱ्या व महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेचा अपमान करणाऱ्या कंगनासारख्या कृतघ्न नटीचे समर्थन करतानाच भारतीय जनता पक्षाने आता आपल्या अकलेचे तारे तोडत मराठी कलाकारांचाही अपमान केला आहे. मराठी कलाकारांची कमाई कंगनासारख्या नट्यांपेक्षा कमी असली तरी ते कंगना व भाजपासारखे कृतघ्न, नतभ्रष्ट नाहीत. त्यांची मराठी माती व संस्कृतीशी नाळ घट्ट जोडलेली आहे. आम्हाला या मराठी कलाकारांचा अभिमान असून त्यांचा अपमान करणाऱ्या भाजपाचा धिक्कार आहे, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.
महाराष्ट्र भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांचा समाचार घेताना सचिन सावंत म्हणाले, "मराठी कलाकार डोंबिवलीमध्ये राहत असले तरी त्यांच्या कलेचा दर्जा कमी नाही. हे अवधूत वाघसारख्यांना माहित नाही. कंगनासारख्या वाचाळ, मराठी व महाराष्ट्राच्या अस्मितेला ठेच पोहचवणाऱ्या, मुंबईला पाकिस्तान म्हणणाऱ्या, मुंबई महापालिकेला बाबरसेना म्हणणाऱ्या नटीचे समर्थन करणारे हे भाजपाचे बोलविते धनी आहेत, हे स्पष्ट आहे. यातूनच कंगनासारख्या पूर्वीच्या ड्रग अॅडिक्ट नटीची तुलना झाशीच्या राणीशी करणाऱ्यांची बौद्धीक पात्रता महाराष्ट्राने पाहिली आहे. आता मराठी कलाकारांबद्दल गरळ ओकून पुन्हा एकदा भाजपा हा महाराष्ट्रद्रोही पक्ष आहे हे त्यांनीच दाखवून दिले आहे.
मराठी कलाकार, त्यांच्या अभिनयाचा दर्जा व चित्रपट सृष्टीतले त्यांचे योगदान काय आहे, याचा अवधूत वाघ सारख्या सुमार बुद्धीच्या लोकांनी अभ्यास करावा आणि मग मराठी कलाकारांबद्दल बोलावे, असा मोफत सल्लाही सावंत यांनी दिला आहे. चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके हे मराठीच होते. व्ही. शांताराम, रमेश देव, सीमा देव, डॉ. श्रीराम लागू, नाना पाटेकर, माधुरी दीक्षित, अश्विनी भावे यांच्यासारख्या शेकडो मराठी निर्माते, तसेच असंख्य कलाकार व चित्रपटसृष्टीशी संबंधीत मराठी कर्मचाऱ्यांच्या मेहनतीने ही चित्रपटसृष्टी उभी राहिली आहे आणि त्याच जीवावर कंगनासारखे उपरे आज जगत आहेत. मराठी कलाकारांनी त्यांच्या दर्जेदार अभिनयाने जग जिंकले आहे. त्यांची नाळ मराठी मातीशी, संस्कृतीशी जोडलेली आहे, अशा कलाकारांना पैशाच्या तराजूत तोलून अवधूत वाघ यांनी त्यांचा अपमान केला आहे.
मुंबई, महाराष्ट्र व मराठी माणसाबद्दल भाजपाला नेहमीच आकस राहिला आहे. मागील पाच वर्षांत महाराष्ट्राचे वैभव गुजरातला देऊन त्यांनी ते दाखवून दिलेच आहे. आता कंगनासारख्यांच्या दावणीला बांधून त्यांनी त्यांची पायरी स्वतःच दाखवून दिली आहे. मराठी कलाकारांचा आम्हाला अभिमान तर आहेच पण त्यांचा असा उपहास करणाऱ्या, कमाईवरून त्यांना हिणवणाऱ्या, कंगनाला झाशीची राणी आणि मराठी कलाकारांना रंक म्हणणाऱ्या भाजपाचा आपण तीव्र शब्दात धिक्कार करत आहोत, असे सावंत यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या -
CNG, PNG डिस्ट्रिब्यूटर होण्याची संधी, मोदी सरकार देणार लायसन्स
कोरोना व्हायरस : "जब तक दवाई नहीं, तब तक ढिलाई नहीं"; पंतप्रधान मोदींनी दिला सावधगिरीचा इशारा
मोदी सरकार आणतंय नवी पॉलिसी, भंगारमध्ये जाणार तुमची जुनी गाडी
कमावण्याची संधी : 'या' IPOमध्ये पैसे गुंतवण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, फक्त 3 तासांतच सुपरहिट!