- निम घोलकर
ऑस्ट्रेलिया म्हटलं की डोळ्यांसमोर येतात कांगारू, लांबवर समुद्रात असणारा मोठा भूखंड आणि फारतर क्रिकेट. पण 70 च्या दशकामध्ये अनोळखी दूरवर असणाऱ्या या खंडावर मराठी लोकांचंही आगमन झालं. सुमारे 2.4 कोटी लोकसंख्येच्या या देशामध्ये आज 20 हजार मराठी लोकांचा समुदाय सुखेनैव नांदत आहे. मायभूमीपासून, मराठी भाषेपासून इतक्या दूर राहत असलो तरी आमच्या या मराठी बांधवांमधलं मराठीपण आजिबात संपलेलं नाही. मराठी माणूस महाराष्ट्राची सीमा उल्लंघून बाहेर जाऊ शकतो पण त्याच्यामध्ये मुरलेला 'महाराष्ट्र' काढून घेता येत नाही. आमचंही तसंच आहे.
मराठी बांधवांनी एकत्र येऊन प्रत्येक मोठ्या शहरांमध्ये मराठी मंडळांची स्थापना केलेली आहे. तसेच त्यांचे फेसबुकवर ग्रूपही आहेत. सिडनी आणि मेलबर्नमध्ये मराठी रेडिओ स्टेशन्सही आहेत. ही सगळी मंडळं गणपती, दिवाळी, मकर संक्रांत असे सण साजरे करतात. या सणांमध्ये लोकांचा उत्साह थेट महाराष्ट्रासारखाच असतो. ढोल ताशांचा निनाद आणि लेझीमचा नाद अगदी तसाच कानावर येतो. वटपौर्णिमा, मंगळागौर असे खास सण आम्ही महिला साजरे करतो. यावेळेस हळदीकुंकूही होतं, अगदी नऊवार पातळं, पैठण्या नेसून आणि नथ वगैरे सगळे मराठमोळे दागिने लेवून.
मराठी सांस्कृतिक जगतामध्ये काय चाललंय याची आम्हाला उत्सुकता असतेच. आता मराठी सिनेमा ज्या दिवशी महाराष्ट्रात प्रदर्शित होतात त्याच दिवशी येथेही मल्टिप्लेक्स सिनेमागृहात प्रदर्शित होतात. तसेच अनेक मराठी कलाकारांच्या तसेच गायकांच्या मैफली, नाटकंही येथे होतात. त्यामुळे इतकी वर्षे टीव्हीच्या पडद्यावर पाहिलेल्या आपल्या आवडत्या कलाकारांना जवळून पाहण्याची संधी आम्हाला मिळते. ऑस्ट्रेलियात राहाणारे मराठी लोक माहिती तंत्रज्ञान, वैद्यकीय क्षेत्र, संशोधन, प्रशासन अशा विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करून समाजोपयोगी कार्य केल्याबद्दल काही मराठी लोकांना 'ऑस्ट्रेलिया डे' पुरस्कारही (आपल्या पद्म पुरस्काराच्या समकक्ष) मिळालेला आहे. काही मराठी लोकांनी व्यवसायातही नाव कमावले आहे. मराठी महिलाही उद्योगक्षेत्रात आता पुढे येत आहेत. मायभूपासून दूर आल्यानंतर मातृभाषा कानावर पडणं कमी होत जातं, पण आम्ही सगळे भेटल्यावर मराठीत बोलण्याचा आवर्जून प्रयत्न करतो.
आपली भाषा पुढच्या पिढीला शिकवण्याचा प्रयत्न सुरू असतोच. आताची इथली मराठी पिढी खरंच नशीबवान आहे. आठवड्याच्या शेवटी मराठी शिकण्याचे तास असल्यामुळे त्यांना मराठी भाषा शिकता येते. माझी तिन्ही मुले सिडनीमध्येच मोठी होत आहेत. आम्ही घरात मराठीच बोलतो आणि माझ्या मुलांनाही मराठीची माझ्याइतकीच ओढ आहे. पिझ्झा-पास्ता असे परदेशी पदार्थ चाखताना वरणभाताची चव विसरता येत नाही आणि वरणभाताच्या चवीची सर दुसऱ्या कोणत्याच पदार्थाला येत नाही यावर आमच्या सगळ्यांचं एकमत आहे.
(निम घोलकर या सिडनी येथे राहतात. गेली अनेक वर्षे सक्सेस कोच म्हणून कार्यरत. त्यांनी दोन पुस्तकांचे लेखनही केले आहे.)