- तृप्ती तावडे - आंब्रे
या घरट्यातून पिल्लू उडावे, दिव्य घेऊनी शक्तिआकांक्षांचे पंख असावे, उंबरठ्यावर भक्ति
१६ जून २०१५ घरच्यांचा निरोप घेऊन मी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आत शिरले. माप ओलांडून सासरी जावं हे असंच काहीसं होतं. इथून पुढे कोणीही आपल्या परिचयाचं नसणार या कल्पनेनेच त्यावेळी माझं मन सुन्न झालं होतं. उराशी अनेक स्वप्न बाळगून मातीचा गंध हृदयात जपून मी सॅन फ्रान्सिस्कोला उतरले. पुढच्या फ्लाईटसाठी ३-४ तास होते, सवयीप्रमाणे माझ्या साथीला होत माझं पुस्तक. त्यावेळी मी उमा कुलकर्णी यांचं अनुवादित पर्व वाचत होते.
आपण मराठी आहात का?, असा अनपेक्षित प्रश्न माझ्या कानावर आला. मी चमकून वर बघितले. एक ३५ वर्षीय माणूस मला हा प्रश्न विचारत होता. मी होकारार्थी मान हलवली. खरं तर माझ्यासाठी हा सुखद धक्काच होता. मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की, सॅन फ्रान्सिस्को विमानतळावर कोणी माझ्याशी मराठीत बोलेल. त्या व्यक्तीने मला जुजबी प्रश्न विचारले. कुठून आली आहेस, कुठे जात आहेस वगैरे. बोलण्याच्या ओघात जेव्हा त्यांना कळलं की, मी सॅन दिएगोला जातेय, तेव्हा ते एका सेकंदाचाही विलंब न करता म्हणाले, 'अगं, माझी एक मैत्रीण ऑस्टिनहून गेल्या महिन्यात तुझ्याच शहरात स्थायिक झाली आहे'. तिची लगेच माहिती त्यांनी मला दिली. पुढे कामाच्या व्यापात तिला संपर्क करायचा राहूनच गेला माझ्याकडून. पण अचानक महिनाभराने मला त्या मुलीचा फेसबुकवर मेसेज आला. आम्ही भेटलो आणि काही काळातच आमच्यात मैत्रीचं नातं निर्माण झालं. भाषा हे फक्त संभाषणाचं माध्यम नसून भाषेत मन जोडण्याचं सामर्थ्य आहे हे मला पहिल्यांदाच जाणवलं.
आज परदेशात केवळ मराठी भाषेमुळे एकत्र आलेली अनेक कुटुंब आहेत. गेल्या वर्षी आम्ही मैत्रिणींनी मिळून दिवाळी पहाट हा कार्यक्रम विनामूल्य करायचे ठरविले. तेव्हा बऱ्याच मराठी कुटुंबीयांनी स्वतःहून पुढे येऊन देणगी देऊ केली. या सर्वांच्या आशीर्वादामुळेच सॅन दिएगोकर सायली ओक हिच्या सुमधूर स्वरांचा आनंद लुटू शकले. जरी आम्ही मातृभूमीपासून दूर राहत असलो तरी हृदयात मराठी भाषा कोरली आहे हेच प्रत्येकाच्या प्रामाणिक प्रयत्नातून दिसत होते.
मराठी भाषा नवीन पिढीमध्ये रुजवण्याचे कार्य अमेरिकेत मराठी शाळा मोठ्या प्रमाणात करत आहेत. सॅन दिएगोमध्ये श्री व सौ मोहरीर हे कार्य गेल्या १० वर्षांपासून करताहेत. मेधाताई ह्या सर्व नातवंडांच्या खऱ्या अर्थाने आजी आहेत. १० वर्षांपूर्वी मुलांना मातृभाषेची गोडी लागावी आणि भारतात जाऊन आपल्या आप्तस्वकीयांशी मराठीत संभाषण करता यावं या उद्देशाने ५ मुलांना घेऊन सुरू केलेल्या शाळेत आज ९० हून अधिक विद्यार्थी आहेत. मुलांमध्ये मराठी भाषा मेधाताईंनी रुजवली आणि फुलवली आहे. महाराष्ट्रामध्ये जेथे मराठी भाषेचे अस्तित्व टिकवण्यासाठी लढा द्यावा लागतो, तिथेच सातासमुद्रापलीकडे अमेरिकेत मराठी शाळेच्या माध्यमातून पालक आपल्या पाल्यांना मराठी भाषा शिकवण्यासाठी जे प्रयत्न करत आहेत ते पाहून नक्कीच ऊर अभिमानाने भरून येतो. विशेष म्हणजे मुलंही ही भाषा अगदी सहज आत्मसात करताना दिसून येतात. अशाच प्रयत्नानंमुळे मराठी भाषा व संस्कृती टिकून तर राहीलच, पण वृद्धिंगतही होईल यात शंकाच नाही.
(लेखिका मुळची मुंबईची राहणारी असून गेल्या दोन वर्षांपासून सॅन दिएगो येथे वास्तव्यास आहे)