मुंबई : राज्यात १४ जानेवारीपासून मराठी भाषा विभागाने मराठी भाषा पंधरवडा निमित्ताने ‘साहित्य सेतू’ उपक्रम जाहीर केला आहे. हा उपक्रम केवळ मुंबई, पुणे केंद्री व तिथलेच मान्यवर केंद्री का, असा प्रश्न राज्यातील इतर विभागांना पडत असतो हे लक्षात ठेवणे शासनाचेच काम आहे, अशी तीव्र भावना अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीचे संयोजक डॉ. श्रीपाद जोशी यांनी पत्राद्वारे व्यक्त केली आहे.
केवळ पुण्या-मुंबईतील साहित्यिक व साहित्य संस्थांचा समावेश मराठी संवर्धन पंधरवड्यात केला असल्याने याबाबत मराठी भाषा विभागासह मुख्यमंत्री, मराठी भाषा मंत्री, तसेच विश्वकोश मंडळ सचिव आणि राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक यांनाही पत्र लिहिण्यात आले आहे. या पत्रात, आम्ही महाराष्ट्राचेच भाग आहोत, याचे शासनाला वारंवार स्मरण का करून द्यावे लागते, अशी विचारणा शासनाला केली आहे. शासनाला अशा उपक्रमांमध्ये महाराष्ट्राच्या सर्व विभागांतील प्रतिभेला सामावून घेणारा सहभाग द्यावा असे धोरण असावे असे का वाटत नाही, असा सवालही जोशी यांनी पत्रात उपस्थित केला आहे.
याबाबत अधिक माहिती देताना डॉ. श्रीपाद जोशी यांनी सांगितले की, शासनाच्या अशा कार्य पद्धतीमुळेच विविध विभागांत विलगतेची भावना प्रबळ होण्यास खतपाणी मिळते आणि महाराष्ट्र संयुक्तच राखू इच्छिणाऱ्यांचे बळ क्षीण केले जात आहे. त्यायोगे भाषिक, सांस्कृतिक ऐक्यालादेखील बाधा पोहोचते, हेदेखील पत्रातून शासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.