सांगली : गणेशोत्सवाचा जल्लोष महाराष्ट्रात घुमत असताना, स्कॉटलँडमधील एडिनबर्ग येथे आपल्याच महाराष्ट्रीय कुटुंबांनी प्रथमच गणेशोत्सव साजरा करताना मोठा जल्लोष केला. सांगली, सातारा, कोल्हापूरसह राज्यातील शेकडो कुटुंबियांनी एकत्र येऊन ही प्रथा याठिकाणी पाडली. विशेष म्हणजे त्याठिकाणच्या विदेशी नागरिकांनीही यात सहभाग घेतला होता. मूळच्या विटा येथील असलेल्या व स्कॉटलँडमध्ये वास्तव्यास असलेल्या शीला भोसले यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, एडिनबर्ग येथे यापूर्वी कधीही असा भारतीय उत्सव झाला नव्हता. गणेशोत्सवाचा श्रीगणेशा करताना स्थानिक लोकांचाही यात सहभाग नोंदला गेला. जवळपास ५०० लोकांच्या सहभागाने हा उत्सव नटला. जल्लोष विदेशात असला तरी, तो अस्सल महाराष्ट्रीय वाटला पाहिजे, म्हणून मराठी कुटुंबियांनी खास महाराष्ट्रातून ढोल-ताशा आणि लेझीम पथकांना निमंत्रित केले होते. त्यामुळे भगवे झेंडे, पताका आणि पारंपरिक वाद्यांच्या तालावर एडिनबर्ग नाचले. सांस्कृतिक कार्यक्रमात गणेशवंदनेच्या भक्तिरसापासून ते लावणीच्या शृंगाररसापर्यंत विविध प्रकारांनी कलाकारांनी उपस्थितांचे मनोरंजन केले. एडिनबर्गमधील मराठी अभिजनांसोबतच, स्कॉटलँडच्या ग्लासगो, डंडी आदी शहरातील लोकांची उपस्थितीही लक्षणीय होती. या उत्सवात ढोलांच्या तालावर ठेका धरून मराठी, बंगाली, कानडी व सर्व भारतीय त्याचबरोबर स्थानिक स्कॉटीश पण मिरवणुकीत उत्साहाने सामील झाले होते. यामध्ये साताऱ्याचे नीलेश कणसे, सांगलीच्या शीला भोसले तसेच सविता पुरण, नेत्रा बोडस, प्राजक्ता व्यवहारे, पूनम कोतवाल, दीपा पाटील, आरती चव्हाण, अंजली पटवर्धन, रश्मी सचने, प्रणाली यादव आदी कुटुंबियांनी पुढाकार घेतला होता. (प्रतिनिधी)...जणू महाराष्ट्रच अवतरला गणरायाची आरती, साड्या आणि कुर्ता घालून पारंपरिक पद्धतीने या मराठी कुटुंबियांनी उत्सवात रंग भरला. सिटी कौन्सिलच्या नियमानुसार ईको-फ्रेंडली गणेशमूर्ती खास मुंबईहून मागविण्यात आली होती. स्थानिक मंदिराच्या सभागृहात स्थापनेपासून ते विसर्जनादरम्यान दररोज सकाळी व सायंकाळी स्थानिक कुटुंबांनी आरती व महाप्रसादाचे आतिथ्य केले. विसर्जनाच्या मिरवणुकीवेळी खास पुण्याहून मागवलेल्या लेझीम, ढोल, ताशे व कोल्हापुरी फेट्यांनी एडिनबर्गच्या रस्त्यांवर जणू महाराष्ट्रच अवतरला होता.
एडिनबर्गमध्ये गणेशोत्सवाचा मराठी जल्लोष
By admin | Published: September 16, 2016 11:04 PM