बाळकृष्ण परब/ऑनलाइन लोकमत
पु. भा. भावे साहित्यनगरी डोंबिवली, दि. 5 - "अब्दुल कलामांचा जन्मदिन वाचक दिन म्हणून साजरा केला तेव्हा दोन कोटी पुस्तकांचे वाचन झाले. आता यंदाच्या मराठी भाषादिनी इंटरनेटवर मराठी वाढावी हा शासनाचा प्रयत्न असेल. त्यासाठी विकिपीडिया, इंटरनेटवर कोट्यवधी पाने टाकण्याचा संकल्प केला आहे." असे म्हणत राज्याचे मराठी भाषा आणि सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी मराठी भाषा आणि साहित्य याबाबतच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले. अखिल 90 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या सामारोपप्रसंगी ते बोलत होते.
कला ही राजश्रित असू शकत नाही त्यामुळे आम्ही साहित्य, कलेला पुरस्कृत करू, असे उद्गार काढत मराठी भाषा आणि साहित्य याबाबत च्या मागण्यांचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले. यावेळी तावडे यांनी मराठी भाषेच्या विकासासाठी करण्यात येत असलेल्या कामाचा आढावा घेतला. ते म्हणाले,गेल्या साहित्य संमेलनात करण्यात आलेल्या घोषणेप्रमाणे वाईजवळ एक पुस्तकांचे गाव विकसित करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
समारोप समारंभादरम्यान रंगलेल्या हलक्या वादविवादावरही तावडेंनी टिप्पणी केली. "आता राजकारण्यांचं एक साहित्य संमेलन आयोजित करावं, अशी कोपरखळी विनोद तावडे यांनी मारली, तसेच या व्यासपीठावर मतभेद नसल्याने पुढे युतीच्या चर्चा याच व्यासपीठावरून करू असा टोलाही त्यांनी लगावला.