मुंबई : मराठी चित्रपटांवर आॅस्करची नाममुद्रा कोरली जावी, हे मराठी माणसांनी ब-याच वर्षांपासून उराशी बाळगलेले स्वप्न विकास साठ्ये या मुंबईकर युवकाने सत्यात उतरविले. कॅमेरा तंत्र विकसित करण्यासाठी त्याला आॅस्कर सन्मानाने गौरविण्यात आले. उभ्या महाराष्ट्राचा उर भरून यावा, अशीच ही घटना.सिनेमॅटिक कॅमे-याचे देशी तंत्र विकसित करणारे चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या धडपडीवरील ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ हा सिनेमा अनेकांनी पाहिला असेल. याच्या कथानकाशी साजेशी धडपड करत विकास साठ्ये याने ‘के1 शॉटओव्हर’ कॅमेरा तंत्र विकसित करून जागतिक सिनेमाचे छायांकन सुस्पष्ट केले आहे.‘के1 शॉटओव्हर’ या कॅमे-याची निर्मिती करण्यात मोलाचा वाटा उचणारे साठ्ये यांना ९०व्या आॅस्कर अकॅडमी अवॉर्डच्या सायंटिफिक अँड टेक्निकल पुरस्काराने लॉस एंजेलिस येथे गौरविण्यात आले. अकॅडमी आॅफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसच्या निवड समितीने साठ्ये यांच्यासोबत या कॅमे-यावर काम करणारे जॉन कॉयल, ब्रॅड हर्नडेल आणि शेन बकहॅम या तिघांचीही पुरस्कारासाठी निवड केली.हे भारतात मिळालेल्या ज्ञानाचे श्रेय!हा पुरस्कार म्हणजे मला भारतात मिळालेल्या ज्ञानाचे फलित आहे. याचे श्रेय जेवढे माझ्या कामाला-प्रयत्नांना आहे, तेवढेच माझ्या आईवडिलांनाही आहे. माझ्या कुटुंबाला आहे. मराठी माणसामुळे भारताची मान आॅस्करमध्ये उंचावली गेली, याचाही मला आनंद आहे.- विकास साठ्ये, आॅस्कर विजेते.या चित्रपटांमध्ये वापरले गेले तंत्रज्ञान : वॉर फॉर द प्लॅनेट आॅफ द एप्स, द फेट आॅफ दि फ्युरियस, पायरेट्स आॅफ द कॅरेबियन: डेड मेन टेल नो टेल्स, डंकर्क, स्पायडरमॅन: होमकमिंग, ट्रान्सफॉर्मर्स : द लास्ट नाइट... यासारख्या चित्रपटांमध्ये के1 शॉटओव्हर कॅमे-याचे तंत्र वापरले गेले.
मेहनत फळाला आली; दादासाहेब फाळकेंप्रमाणेच धडपडणाऱ्या मराठी अभियंत्याने पटकावला 'ऑस्कर'!
By पवन देशपांडे | Published: February 12, 2018 3:02 AM