मुंबई : २७ फेबुवारी हा कुसुमाग्रजांचा जन्मदिन म्हणजेच, ‘मराठी भाषा गौरव दिन’ यंदा अधिक प्रभावी पद्धतीने साजरा केला जाणार आहे. राज्य वाङ्मय पुरस्कार प्रदान करण्याबरोबरच मराठी भाषेची स्थित्यंतरे उलगडणारा मनोरंजक आणि प्रबोधक कार्यक्रम रसिकांसमोर सादर केला जाणार आहे, यंदापासून दोन नवे भाषाविषयक पुरस्कारही दिले जातील, अशी माहिती मराठी भाषा विभागाचे मंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.पहिला मंगेश पाडगांवकर भाषा संवर्धक पुरस्कार, विपरित परिस्थितीतही वाचन वेड जपणाऱ्या आणि भाजीविक्री करता-करता वाचन संस्कृतीचा विकास साधणाऱ्या अहमदनगर येथील श्रीमती बेबीताई गायकवाड यांना देण्यात येणार आहे, तसेच डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार परदेशातून महाराष्ट्रात येऊन, मराठी शिकून, भाषेचा सखोल अभ्यास करणाऱ्या डॉ. श्रीमती मॅक्सीन बर्नसन यांना प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कारांची घोषणा मराठी भाषामंत्री तावडे यांनी केली. मराठी भाषा गौरव दिनी, २७ फेब्रुवारी रोजी रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे होणाऱ्या कार्यक्रमात ३१ राज्य वाङ्मय पुरस्कार आणि अन्य ४ पुरस्कारांचा प्रदान सोहळा संपन्न होणार आहे. या प्रसंगी सुप्रसिद्ध संगीतकार व गायक कौशल इनामदार आणि इतर प्रथितयश कलाकार ‘मराठीनामा’ हा मराठी भाषेची स्थित्यंतरे उलगडणारा दृकश्राव्य कार्यक्रम सादर करणार आहेत. (प्रतिनिधी)बसेस, स्थानकांवर झळकणार कविता मराठी साहित्याचा मानदंड कुसुमाग्रजांच्या जन्मदिनामित्त २७ फेब्रुवारी रोजी राज्य परिवहन महामंडळ मराठीचा जागर करणार आहे. महामंडळाच्या १८ हजार ५०० बस गाड्या आणि ५६८ स्थानकांवर मराठीचे गुणगाण करणाऱ्या कविता प्रदर्शित केल्या जाणार आहेत. मराठी दिनासाठी मराठमोळ्या एसटी महामंडळाचे पुढाकार घेतल्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी सर्व कार्यालयांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. शनिवारी (दि. २७) सकाळी ११ वाजता मराठीचा जागर करण्यात येणार आहे. कवी कुसुमाग्रज, वि. म. कुलकर्णी, सुरेश भट यांच्याबरोबरच फादर स्टीफन्ससारख्या अमराठी माणसाने रचलेल्या मराठी भाषेच्या गुणगान करणाऱ्या कविता बस आणि स्थानकात प्रदर्शित केल्या जातील. प्रत्येक स्थानकात होणऱ्या या कवितांच्या मराठी भाषा गौरव दिन फलकाचे प्रकाशन त्या त्या भागातील प्रथितयश साहित्यिक ज्येष्ठ पत्रकार, मराठी भाषेचे शिक्षक, प्राध्यापकांकडून करण्यात येणार असून यावेळी लोकप्रतिनिधी, अधिकारी, उद्योजक पत्रकारांना निमंत्रित करण्यात येणार असल्याचे रावते यांनी कळविले आहे. तसेच यानिमित्ताने महाराष्ट्रभर प्रवास करणाऱ्या ६६ लाख प्रवाशांमध्ये मराठी भाषा संवर्धनाची ज्योत प्रज्वलित करण्यात येणार आहे.
‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा होणार
By admin | Published: February 25, 2016 2:48 AM