डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य नगरी मुंबापुरीतूनच मराठी माणूस हद्दपार होत चालला आहे, अशी खंत व्यक्त करत नव्या पिढीतील साहित्यिकांनीही मुंबईचे बदलते विदारक चित्र साहित्यातून मांडले पाहिजे, असे मत पानिपतकार विश्वास पाटील यांनी व्यक्त केले.कोकण मराठी साहित्य परिषदेच्या १६ व्या कोकण मराठी साहित्य संमेलनाची सांगता रविवारी झाली, या प्रसंगी विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते. या वेळेस संमेलनाध्यक्ष जयंत पवार, स्वागताध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, कोमसापचे केंद्रीय अध्यक्ष डॉ.महेश केळुसकर, डॉ.बाळ फोंडके, सारस्वत बँकेचे उपाध्यक्ष गौतम ठाकूर, उपमहापौर अलका केरकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पाटील यांनी हल्ली जगण्यापेक्षा मार्केटिंगला महत्त्व येत आहे, असे म्हणत ‘मेंटेनन्स’नावाचा राक्षस मराठी माणसाला गिळत चालला आहे, अशी खंत व्यक्त केली.१६ व्या कोकण मराठी साहित्य संमेलनात समारोप समारंभाचे प्रास्ताविक करताना ‘कोमसाप’चे केंद्रीय अध्यक्ष डॉ. महेश केळुसकर म्हणाले की, ‘हे संमेलन यशस्वी करण्यासाठी कोमसापच्या कुटुंबाने एकत्रितरीत्या मेहनत केली आहे.’ या संमेलनाचा राज्यातील, देशातील आणि परदेशातील जवळपास ८ लाख ७० हजार साहित्यरसिकांनी आस्वाद घेतल्याची बाबही त्यांनी अधोरेखित केली. या प्रसंगी नाट्यसंमेलनाध्यक्ष गंगाराम गवाणकर यांचा सत्कार करण्यात आला. मालवणीतून सुरुवात : सत्काराला उत्तर देताना गवाणकरांनी अस्सल मालवणीत भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले की, ‘कोकणातल्या माणसाची खासियत आहे, खिशात पैसे असो वा नसो, पण सगळे दणक्यात करुन दाखवतात, तसेच हे संमेलनही कोमसापने दणक्यात करुन दाखवले आहे.’
मराठी माणूस हद्दपार होतोय!
By admin | Published: November 23, 2015 2:22 AM