लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : प्रत्येक दुकानाच्या पाटीवर सुरुवातीला मराठी नाव लिहावे लागेल आणि इतर भाषेच्या इतक्याच ठळकपणे मराठी नाव लिहिणे अनिवार्य असेल, अशी तरतूद असलेले विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत बुधवारी मंजूर करण्यात आले.
महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियमातील पळवाटीचा फायदा घेऊन दहापेक्षा कमी कामगार असलेल्या दुकानांकडून मराठी पाट्या लावण्यास विरोध दर्शवला जात होता. मात्र, आता दुकान मोठे असो किंवा लहान प्रत्येक ठिकाणी मराठी पाटी लावावीच लागेल, अशी तरतूद करीत पळवाट शोधणाऱ्यांना चाप लावण्यात आला आहे.महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम २०१७ मध्ये ही महत्त्वाची सुधारणा करण्यात आली आहे. याआधी दहापेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापना व दुकान नियमांतून पळवाट काढत असल्याचे आढळून आले होते. ही पळवाट काढून टाकण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतल्यानंतर बुधवारी याविषयीचे विधेयक दोन्ही सभागृहांत मांडून त्यावर मंजुरीची मोहोर उमटविली. राज्यपालांच्या मंजुरीनंतर त्याचे कायद्यात रूपांतर होईल.
बहुसंख्य दुकाने व व्यापारी पेढ्यांमध्ये दहापेक्षा कमी कामगार असतात, हे लक्षात घेता यापुढे रस्त्याजवळच्या सर्वच दुकांनावरील पाट्या मराठीत लागलेल्या दिसतील. मराठीत-देवनागरी लिपीतील अक्षरे अन्य लिपीतील अक्षरांपेक्षा लहान ठेवता येणार नाहीत, अशीही दुरुस्ती केली आहे. यामुळे आता राज्यातील सर्व दुकानांवर मराठी भाषेतील पाट्या झळकतील, असे सांगताना विधेयकाच्या मंजुरीबद्दल मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी आनंद व्यक्त केला.
- नामफलकावर सुरुवातीला मराठी मोठ्या अक्षरात असेल तर त्या शेजारी अन्य कोणत्याही भाषेत नाव लिहिण्यास मनाई केलेली नाही.
- दुकानांच्या नाम फलकावर सुरुवातीला मराठी अक्षरातच दुकानाचे नाव लिहिलेले असावे.
- मराठी अक्षराचा आकार हा अन्य कोणत्याही भाषेच्या आकारापेक्षा कमी असता कामा नये.