- भरत दाभोळकर
गुरू या संकल्पनेवर विश्वास नसलेला एक यशस्वी अॅड गुरू, लेखक, नट, डान्सर, बॉक्सर आणि खूप काही असणारा हरफनमौला भरत दाभोळकर उघडतोय त्याच्या अनुभवाची आणि वेगळ्या दृष्टीची पोतडी...नियमितपणे दर मंगळवारी खास लोकमतसाठी...
लोकमत एक्सक्लुझिव्हभाषा आणि भाकरी यांचं नातं अतूट असतं. आपण नव्या मिलेनियममध्ये म्हणजे एकविसाव्या शतकात प्रवेश केला तेव्हा भाकरीशी असलेला भाषेचा संबंध आणखी घट्ट झाला होता. अनेकांची समजूत आहे, की मला इंग्रजी नीट येत नसेल, तर आयुष्य व्यर्थ आहे. यश माझ्या जवळपासही फिरकणार नाही. पण मी माझ्या वाटचालीवरून खात्रीनं सांगतो...मराठी आहात, चिंता करू नका...नो प्रॉब्लेम! महाराष्ट्रातल्या लाखो-करोडो मुलांसारखा मीही मराठी शाळेत शिकलो. मुंबईतल्या गिरगावातल्या आर्यन हायस्कूलचा मी विद्यार्थी. सातव्या इयत्तेच्या आधी आम्हाला इंग्रजी हा विषयही नव्हता. अशी सुरुवात करणारा माझ्यासारखा माणूस जगाच्या पाठीवर कुठेही भाषिक न्यूनगंड न ठेवता वावरतो आहेच की!
आमची शाळा म्हणजे भगवद््गीतेचे पाठ म्हणायला लावणारी. अस्सल मराठमोळी. माझ्यावेळी ११ वी मॅट्रिकची व्यवस्था होती. १० वीत असताना मी गणिताचा नाद सोडला. ऐच्छिक विषयाच्या सोयीचं गणित सोडवलं. मग ११ वीत फर्स्ट क्लास मिळवून एलफिन्स्टन कॉलेजच्या आर्ट््स शाखेत दाखल झालो. त्या काळीही म्हणजे १९६० च्या दशकात एलफिन्स्टन, झेवियर्स ही ‘सोबो’ तली म्हणजे साऊथ बॉम्बेतली इंग्रजाळलेली कॉलेजेस. अर्थात एलफिन्स्टनमधला मराठी भाषा विभागही तगडा होता. पु.शि. रेगे, म.वा.धोंड, विजयाबाई राजाध्यक्ष अशी नामवंत शिक्षकांची फौज होती. इंग्रजी विभागात मंगेश विठ्ठल राजाध्यक्षांसारखे तालेवार प्राध्यापक होते. गंमत म्हणजे आर्टसच्या वर्गात १४५ मुली आणि आम्ही पाच मुलगे! पारशी आणि अमराठी मुलींचा भरणाच अधिक.
छाया - सुशील कदम
मुलांपैकी एखाद-दुसऱ्याला इंग्रजी बोलण्याचा गंध होता. पु.शि. रेग्यांचा मुलगा मनोजही आमच्याच वर्गात होता. पण त्या सत्यवानालाही फ्रॉक अन मिडीतल्या सावित्रींशी बोलायला घरून मज्जाव होता, बहुधा! माझा इंग्रजीचा संबंध पेपर लिहिण्यापुरता. बोलण्याचा सराव कुठला असायला? त्यामुळे व्हायचं असं की एखाद्या मुलीनं सिनेमाला येतोस का, असं विचारलं की तिला इंग्रजीतून उत्तर देताना आधी डोक्यात मराठी उत्तर यायचं...आईला मी जेवायला येतो म्हणून सांगितलंय. त्यामुळे जमणार नाही...आता याचं इंग्रजी भाषांतर डोक्यात सुरू होऊन ते मनातल्या मनात घोळवून ओठांवर येईपर्यंत ती कन्या सिनेमाला जाऊन परतही आली असायची. यातला विनोदाचा भाग सोडा. पण मूळ मुद्दा होता, आपल्या गल्लीत सहज वावरायचं की हद्द ओलांडून दुसऱ्या वस्तीत शिरायचं. बहुसंख्य मुलं-मुली आजही आपल्या मातृभाषेच्या कंपूत वावरणं पसंत करतात. त्यातून मराठी मुलं मराठी वाडमय मंडळात, इंग्रजी नीट बोलणारी इंग्लिश लिटरेचर क्लबात, गुजराती त्यांच्या गुजराती मंडळात आणि हिंदी, राष्ट्रभाषेच्या सभेत!
प्रत्यक्षात आपली मैत्री आपल्याला कुठली भाषा नीट येते यावर होत नसते. चुकलंमाकलं म्हणून मित्र-मैत्रिणी हसत नाहीत. हे जेव्हा मला पक्कं कळलं तेव्हा मी मराठीचं कुंपण ओलांडली आणि बहुभाषिक अंगणात बागडायला लागलो. फर्स्ट इयरला असताना उसना नवरा या कॉलेजच्या मराठी नाटकात मला रोल मिळाला होता. ती तालीम म.वा. धोंड ऐकायचे. एके दिवशी त्यांनी फर्मान सोडलं...तो कोण मुलगा आहे, तो काम नीट नाही करत...काढून टाका त्याला! झालं...त्या फर्मानानं मी मराठी मंडळातून हद्दपार झालो. पण त्यामुळेच माझा इंग्रजी म्युझिक आणि ड्रामा सर्कलमध्ये प्रवेश झाला. कामचलाऊ इंग्रजीखेरीज मला मराठी, हिंदी आणि वाळकेश्वरला राहिल्यानं गुजराती चांगली येत असे. जेव्हा मला इंग्रजी नीट बोलताही येत नव्हतं, त्या काळात मी सीआरच्या इलेक्शनमध्ये फाडफाड इंग्रजी बोलणाऱ्या पारशी मुलींना हरवलं.
कालांतरानं मी हिंग्लिश नाटकांचा जो प्रयोग केला, त्यातल्या हिंग्लिशला पहिली पावती माझ्या कॉलेजच्या इलेक्शननं दिली होती. ज्याला इंग्रजी नीट बोलता येत नाही, अशा माझ्यासारख्या मराठी मुलाला वर्गाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. हमिल नावाचे आमचे एक माजी प्राचार्य होते, त्यांच्या नावे हमिल सभा स्थापन झालेली. त्याचा अध्यक्ष हमखास इंग्रजी मंडळातलाच कोणीतरी होत असे. १९७० साली मी हमिल सभेचा अध्यक्ष झालो. एलफिन्स्टन कॉलेजच्या शे-सव्वाशे वर्षांच्या इतिहासात हमिल सभेचा चेअरमन झालेला मी पहिला मराठी मुलगा ठरलो! मुद्दा इतकाच की आपण आपल्याच तळ््यात डुंबत राहण्यापेक्षा कुंपणाच्या पलीकडच्या विश्वात डोकावलो, तर भाषा हा काही अडसर नाही, याची जाणीव होती. ती स्वानुभवातून आली तर सोन्याहून पिवळे. तूर्तास मी एवढं नक्की सांगेन...मराठी आहात, नो प्रॉब्लेम...गो अहेड अॅन्ड चेस युवर ड्रीम्स...
बाकी पुढच्या भेटीत