मुंबई : गिरणी कामगारांना मिळणाऱ्या घरांवर दलालांचा डोळा आहे. त्यांच्याकडून ही घरे विकत घेऊन मराठी माणसांना मुंबईतून हद्दपार करण्याचा डाव असून तो हाणून पाडावा, असे आवाहन शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केले. वरळी येथील आचार्य अत्रे चौकातील पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण व सुशोभीकरणाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. ‘मराठी मातीसाठी आवाज उठविणारे आचार्य अत्रे हे खऱ्या अर्थाने योद्धा होते, त्यांचा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर झालेला वाद हा दुर्दैवी होता,’ अशी खंत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. यावेळी महापौर स्नेहल आंबेकर, शहराचे पालकमंत्री सुभाष देसाई,शिक्षणमंत्री विनोद तावडे उपस्थित होते. ठाकरे म्हणाले, ‘पुन्हा एकदा मराठी माणसांना मुंबईतून हद्दपार करण्याचा डाव दलालांकडून आखला जात आहे. ज्या गिरणी कामगारांना म्हाडा किंवा इतर माध्यमांतून मुंबईत घरे मिळाली, त्या कामगारांच्या मागे दलालांनी तगादा लावला आहे. कामगारांची इच्छा नसतानाही घर विकण्याचा आग्रह धरला जात आहे. मात्र गिरणी कामगारांनी दलालांना बळी पडू नये. या दलालांचा बंदोबस्त शिवसेना आपल्या पद्धतीने करेल. अत्रे आणि ठाकरे कुटुंबीयांचे पूर्वीपासून ऋणानुबंध आहेत. लिहिणारे खूप असतात पण आचार्य अत्रे यांच्यासारख्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या सिद्धहस्त लेखणीतून जे काही उतरले ते महत्त्वाचे आहे. भावी पिढीपर्यंत ते पोहोचले पाहिजे आणि संयुक्त महाराष्ट्राचा लढा, त्यांना कळला पाहिजे,’ असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)पुतळ्याचे अनावरण...वरळी येथील आचार्य अत्रे चौकातील पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, महापौर स्नेहल आंबेकर, शहराचे पालकमंत्री सुभाष देसाई, शिक्षणमंत्री विनोद तावडे उपस्थित होते.
मराठी माणसांना हद्दपार करण्याचा डाव
By admin | Published: August 14, 2016 3:21 AM