पुणे : यंदाचे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन कुठे होत आहे हे महत्त्वाचे नाही़ त्या वादामध्ये मला पडायचे देखील नाही. पण २० वर्षे झाले एकही मराठी नाटक कर्नाटक भागापर्यंत पोहोचू शकलेले नाही. नाटकांच्या गाड्या कर्नाटक सीमेवर अडवल्या जातात. संमेलनाच्या निमित्ताने या प्रांतात पुन्हा मराठी नाटक पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी सांगितले. पंढरपूरमध्ये झालेल्या ९४व्या नाट्य संमेलनाच्या समारोपात आगामी नाट्य संमेलन बेळगावमध्येच व्हावे, या मागणीने जोर धरला होता. येळ्ळूरमध्ये मराठी भाषिकांवर नुकत्याच झालेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर नाट्यकलावंतांनी निषेध व्यक्त करण्यासाठी या भागात फेरी काढण्याचे ठरविले. मात्र संचारबंदी लागू झाल्यामुळे त्यांना तेथे जाता आले नाही. कोल्हापूरमध्ये सभा घेऊन त्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला. त्यामुळे संमेलन बेळगावमध्येच व्हावे यासंबंधीचे पत्रही नियामक मंडळाच्या सदस्यांकडून मोहन जोशी यांना देण्यात आले होते, याचा विचार करून संमेलन बेळगावमध्ये घेण्याचा प्रस्ताव नियामक मंडळाच्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला. अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर हे संमेलन बेळगावमध्ये होत आहे, याविषयी जोशी यांना विचारले असता ते म्हणाले, त्या भागात मराठी भाषिकांची संख्या अधिक आहे. वीस वर्ष झाली कर्नाटक भागात मराठी नाटक पोहोचू शकलेले नाही, हे खेदजनक आहे. मराठी नाटक कर्नाटकाच्या प्रांतात पुन्हा सुरू व्हावे अशी आमची इच्छा आहे. हा राज्याशी निगडित मुद्दा असला तरी आम्ही केंद्र सरकारच्या माध्यमातून हा प्रश्न धसास लावणार आहोत. केंद्राचा निर्णय हा राज्याला मान्य करावाच लागेल.
मराठी नाटक कर्नाटकात नेणार
By admin | Published: November 20, 2014 2:30 AM