नागपूर : जेष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना पाठवण्यात आलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचे निमंत्रण आयोजकांनी रद्द केल्यानंतर सध्या या प्रकरणावरुन वाद सुरु झाला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे साहित्य विश्वात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
विदर्भ साहित्य संघाच्या ई-मेलवर श्रीपाद जोशी यांनी आपला राजीनामा पाठविला आहे. त्यामध्ये त्यांनी सहकार्याबद्दल आभार मानले आहेत. दरम्यान, सध्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे उपाध्यक्ष असलेल्या विद्या देवधर यांच्याकडे अध्यक्षपदाची सुत्रे येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, जेष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना पाठवण्यात आलेले मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटनाचे निमंत्रण आयोजकांनी रद्द केले आहे. सुरक्षेच्या कारणावरून निमंत्रण रद्द करण्यात आल्याचे कारण देणारा ईमेल नयनतारा सहगल यांना आयोजकांकडून पाठवण्यात आला आहे. सत्ताधारी पक्षाकडून आलेल्या राजकीय दबावामुळे नयनतारा सहगल यांना पाठवण्यात आलेले निमंत्रण रद्द करण्यात आल्याचे बोलले जात आहे. या प्रकारामुळे महाराष्ट्रातील साहित्यविश्वात खळबळ उडाली असून, आयोजकांच्या कृतीचा निषेध केला जात आहे.