शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

Marathi Sahitya Sammelan: इवल्याशा माणसाभोवतीचे अफाट विश्व...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2021 5:54 AM

Marathi Sahitya Sammelan: नाशिक येथील ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. Jayant Narlikar यांच्या अध्यक्षीय भाषणाचे संपादित संकलन.

विज्ञानाचे मनोरंजक चित्र समाजापुढे उभे करायचे काम अनेक लेखकांनी केले आहे. विज्ञानाची ओळख जनसामान्यांस करून देण्याची प्रथा १९व्या शतकात मायकेल फॅरेडे याने सुरू केली. फॅरेडेने भाषणे, प्रयोग, प्रात्यक्षिके, लेखन आदी करून आपले शोध सोप्या भाषेत समजावून सांगितले. त्या प्रयत्नातून जन्माला आलेली विज्ञानसंस्था रॉयल इन्स्टिट्यूशन आजही ते काम चोखपणे बजावीत असते.

अशा पार्श्वभूमीवर मराठी साहित्याकडे पाहिले की त्यात विज्ञान साहित्य किती अल्प प्रमाणात आहे ते दिसून येईल. विज्ञानकथालेखक केवळ हाताच्या बोटांवर मोजण्याइतके आणि प्रतिष्ठित साहित्यिकांमध्ये विज्ञानाबद्दल (आदर असला तरी) एक प्रकारची भीती दिसून येते. विज्ञान म्हणजे आपल्या आकलनापलीकडले असा बहुतेक साहित्यिकांचा ग्रह झालेला असल्याने ते आपली प्रतिभा विज्ञानाच्या दिशेने चालवायला धजत नाहीत. अनेकदा वाचक किंवा श्रोतेदेखील आपल्याला वैज्ञानिक तथ्ये समजणारच नाहीत, असा ग्रह बाळगतात.

विज्ञान कथालेखकाची ही अवस्था तर विज्ञान समाजापर्यंत मनोरंजक पद्धतीने मांडण्याचे काम किती लोक करतात? सुदैवाने असे लेखन करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. तरीदेखील अद्यापि समाजात विज्ञानाने पाय रोवलेले नाहीत याची पदोपदी जाणीव होते. खगोलशास्त्र आणि फलज्योतिष यांच्यातला मूलभूत फरक अजून तथाकथित सुशिक्षितांनादेखील कळत नाही हे पाहून मन खिन्न होते. “तुम्ही फलज्योतिषाला विज्ञान म्हणत नाही याचे कारण तुमची मनोवृत्ती पूर्वग्रहदूषित आहे,” असा आरोप जेव्हा माझ्यासारख्या वैज्ञानिकावर केला जातो तेव्हा हसावे की रडावे हे कळत नाही.

सर्वसामान्य माणसाची (अर्थात भारतातील) एक अशी गोड गैरसमजूत आहे की, आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञान हे आपल्या पूर्वजांना माहीत होते आणि ते वेदादी करून पुरातन वाङ्मयात समाविष्ट आहे. ह्या बाबतीत वस्तुस्थिती काय आहे ते थोडक्यात नमूद करतो. जर पुरातन समाज वैज्ञानिकदृष्ट्या अतिप्रगत असेल तर त्याचे प्रतिबिंब पुरातन साहित्यात सापडायला पाहिजे. पुष्पक विमान, क्षेपणास्त्रे, दूरदृष्टी इत्यादींची उदाहरणे पुराणात सापडतात. परंतु ती गोष्टीरूपाने आहेत, ज्याला आपण गणितीय विज्ञान वाङ्मय म्हणतो त्या स्वरूपात नाहीत.

हा फरक एका आधुनिक उदाहरणाने स्पष्ट करतो. अपोलो ११ या अंतराळ स्वारीत मानवाने चंद्रावर जाऊन दाखविले. ह्या स्वारीचे सविस्तर वर्णन अनेक वृत्तपत्रांतून आणि नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले. अशीच चंद्रावरच्या स्वारीतील हकिकत जुल्स व्हर्नच्या लिखाणात सापडते. समजा, इतर कुठलीही माहिती उपलब्ध नसेल तर ह्या दोन स्वाऱ्यांपैकी वास्तविक कुठली आणि काल्पनिक कुठली ते सांगता येणार नाही. परंतु जर अधिक खोलात शिरलो तर आपल्याला अंतराळ तंत्रज्ञानाला वाहिलेले विज्ञान आणि गणिताच्या भाषेत लिहिलेले अनेक प्रबंध, अहवाल आणि अभिलेख सापडतील ज्यावरून अपोलो ११ चे यान कसे तयार केले, त्याची एकंदर यात्रा कशी आखली गेली, अंतराळवीरांना कुठल्या कुठल्या चाचण्यांतून जावे लागले वगैरे सर्व तांत्रिक माहिती मिळेल. ह्या दुसऱ्या प्रकारच्या माहितीवरून कुठल्याही तंत्रसमृद्ध संस्कृतीला तशी अंतराळयात्रा आखता येईल.पुराणातील वर्णने फार तर पहिल्या प्रकारची आहेत, दुसऱ्या प्रकारची नाहीत. पुष्पक विमान तयार करायची नियमपुस्तिका (मॅन्युअल) अद्याप उपलब्ध नाही. वायव्यास्त्र, अग्नेयास्त्र वगैरे कसे बनवले जाते याची कृती महाभारतात सापडत नाही. सध्या उपलब्ध पौराणिक वाङ्मयातून केवळ इतकेच निदान करता येते की, ते लिहिणाऱ्यांची कल्पनाशक्ती अचाट होती. परंतु त्यापलीकडे जायला हवा असलेला पुरावा सध्यातरी उपलब्ध नाही.

विज्ञानकथा का लिहाव्यात? विज्ञानकथा लेखकाला एखादी मनोवेधक वैज्ञानिक कल्पना वाचकांपर्यंत आणायची असेल; पण एखाद्या पाठ्यपुस्तकाच्या शैलीत नव्हे. उलट, ती कल्पना गोष्टीरूपाने मांडता आली तर वाचक ती सहजगत्या आत्मसात करू शकेल, अशी भावना लेखकाला प्रेरित करू शकेल. एखादी कडू गोळी गिळायला त्रास होतो; पण ती साखरेच्या आवरणात रंगीबेरंगी करून दिली तर सहजगत्या घशाखाली उतरते. हे उदाहरण देण्यामागे विज्ञानाला ‘कुरूप’, ‘कडू’ म्हणण्याचा उद्देश नाही. तर त्याकडे पाहण्याचा सामान्यांचा दृष्टिकोन कसा असतो, त्यावर भर देण्याचा आहे. शाळेत ज्या अनाकर्षक रीतीने गणित आणि विज्ञान हे विषय ’शिकविले जातात, त्यामुळे विज्ञानाबद्दल सामान्य जनमानसात एक प्रकारची भीती वा अनास्था निर्माण झाली आहे. विज्ञानाशी फटकून वागणारा सामान्य वाचक विज्ञानकथा माध्यमातून विज्ञानाशी जवळीक साधू शकेल.

विज्ञानकथा आणि वास्तविकता १९७६ मध्ये मी एक गोष्ट लिहिली होती (धूमकेतू), ज्यात पृथ्वीशी एका धूमकेतूची टक्कर होण्याची शक्यता चर्चिली होती. वर्षभरात होणाऱ्या या टकरीतून पृथ्वीला व पृथ्वीवासीयांना कसे वाचवायचे? जागतिक स्तरावर वैज्ञानिक एकत्र येऊन धूमकेतूवर अण्वस्त्र धाडायची कल्पना साकार करतात. हे अण्वस्त्र एका अंतराळयानातून धूमकेतूजवळ धाडले जाते व तेथे त्यातून अणुस्फोट घडवून आणला जातो. स्फोटामुळे धूमकेतूला धक्का बसून त्याची दिशा बदलते आणि पृथ्वीवरचे अरिष्ट टळते. त्यानंतर सुमारे १२-१३ वर्षांनी नासापुढे असा प्रश्न आला होता की, जर एखाद्या  लघुग्रहाची किंवा धूमकेतूची टक्कर पुढे संभवत असेल तर त्या अरिष्टापासून पृथ्वीचे रक्षण कसे करावे? - तेव्हा नासातील शास्त्रज्ञ तंत्रज्ञ यांनी सुचविलेला उपाय वरील गोष्टीत वापरल्याबरहुकूम होता. इतकेच नव्हेतर, काही वर्षांतच अमेरिकन शास्त्रज्ञांनी ‘स्पेसवॉच’ नावाचा प्रकल्प चालू केला, ज्यात सौरमालेतील छोट्यामोठ्या वस्तूंची (अशनी, लघुग्रह, धूमकेतू आदी) निरीक्षणे घेऊन त्यांच्या कक्षा ठरविण्यात येतात. उद्देश हा की, जर त्यापैकी एखादी वस्तू पुढेमागे केव्हातरी पृथ्वीवर आदळणार असेल तर त्या संकटाचे निवारण वेळीच करायला वरील मार्ग अवलंबिता येईल.गेले वर्षभर सगळ्या जगात कोविडच्या व्हायरसने थैमान घातले आणि बरेच नुकसान केले. एक प्रकारे आपण विज्ञानकथेत वर्णन केलेली स्थितीच अनुभवत आहोत. वैज्ञानिक मार्गाने वैद्यकीय लस शोधणे हाच  सर्वमान्य उपाय ठरला. कोणत्याही धर्माची कर्मकांडे, फलज्योतिष यांचा उपयोग झाला नाही.

उत्तम आणि निकृष्ट विज्ञानकथा कशा ओळखाव्यात?  सर्वच विज्ञानकथा भविष्यद्रष्टया नसतात.  उत्तम विज्ञानकथेच्या गाभ्यात जे काही विज्ञान असते, ते सध्याच्या माहितीप्रमाणे बिनचूक तर असतेच; पण भविष्यात ते कुठे गेलेले असेल याची माहिती देणारेही असते. अर्थात हे भविष्याचे आडाखे बिनचूक असतीलच असे नाही, पण ते सध्याच्या माहितीशी विसंगत नसावे. हे आडाखे कितपत बिनचूक होते, ते भविष्यकाळ वर्तमानात पोहोचला की ठरवेलच. विज्ञानकथेची क्षमता विज्ञान आणि समाज यांच्यातील परस्परसंबंधांवर ती किती भाष्य करते यावरदेखील अवलंबून असावी. काही निकृष्ट विज्ञानकथा वास्तवात भयकथा असतात. अशा कथा खरोखर विज्ञानकथावृक्षाला मारकच म्हटल्या पाहिजेत. कारण त्या वाचताना विज्ञान एक अनाकलनीय, पण भीतीदायक विषय आहे, असे वाचकाला वाटते.अंतराळयुगातल्या अंधविश्वासांना खतपाणी घालणाऱ्याही काही कथा असतात. उदाहरणार्थ ‘बर्मुडा त्रिकोण’ त्यात भर पडते उडत्या तबकड्यांची. अशा यानातून परकीय जीव येऊन पृथीवर लहान-मोठी संकटे आणतात ही भावना कुठलाही पुरावा नसताना जनमानसात घर करून राहिली आहे. तिला दुजोरा देण्याचे काम अशा विज्ञानकथा करतात.

एखादी विज्ञानकथा व कादंबरी उत्तम वैज्ञानिक कल्पनेवर आधारित असूनही साहित्यिक गुणांच्या अभावामुळे (वाईट लेखनशैली, अपूर्ण स्वभावचित्र इत्यादी) निकृष्ट ठरेल. त्याउलट, विज्ञानात नापास झालेली कादंबरी साहित्यिक गुणामुळे वाचनीय वाटेल.. अशा स्थितीतही विज्ञानकथेचे निकष लावल्यास मी पहिल्या रचनेला दुसरीपेक्षा अव्वल स्थान देईन.

विज्ञानकथा आणि मी विज्ञानकथा लिहिण्यास मी का प्रवृत्त झालो? मी खगोलशास्त्राचा विद्यार्थी असल्याने सत्य काय आहे आणि कथा-कादंबऱ्यांमध्ये काय सांगितले जाते याची मला जाणीव आहे. पृथ्वीवरचे आपले अस्तित्व ध्यानात घेतले तर हे समजते की, माणूस इवलासा आहे आणि त्याभोवतीचे विश्व अफाट आहे. हे सारे विश्व समजून घेणे तसे खूप अवघड आहे. आपण समजतो, त्यापेक्षा हे विश्व अधिक गूढ आहे.

जे स्वतः शास्त्रज्ञ आहेत आणि विज्ञानकथा लिहितात, त्यांना एक फायदा मात्र नेहमी होतो. एखाद्या वैज्ञानिक प्रश्नाविषयी त्यांना जे वाटते, ते आपल्या कथेमध्ये अधिक प्रभावीपणे सांगू शकतात. असे करण्याची मुभा त्यांना या विषयासंबंधीचा शोधनिबंध प्रसिद्ध करताना नसते. शोधनिबंधात तथ्यांवर भर दिला जातो व अटकळींना दुय्यम स्थान असते. काही समीक्षक अशी तक्रार करतात की, माझ्या कथेतील पात्रे खुपदा इंग्रजी शब्दांचा वापर करतात. या समीक्षकांना माझे उत्तर असे की, इंग्रजी शब्दाचा उच्चार न करता त्यांनी दिवसभर मराठी बोलून दाखवावे. त्यांना कळेल की, काही इंग्रजी शब्द हे दैनंदिन जीवनात अगदी रूढ झाले आहेत. इतर भाषेतील शब्द आपल्या भाषेत आल्यामुळे भाषा विकसित होते, समृद्ध होते असे मला सुचवायचे आहे. तज्ज्ञ लोकांच्या समित्या या इंग्रजी शब्दांचे कृत्रिम मराठी भाषांतर देऊ शकतील; पण सामान्य वाचक जर अशा शब्दांना स्वीकारू इच्छित असेल, तर ते शब्द वापरण्यावर बंदी का असावी?

मी विज्ञानकथा का लिहितो? दररोजच्या संशोधनाच्या कामातून विरंगुळा मिळावा म्हणून, सामान्य वाचकाला वैज्ञानिक विश्वातील एखादा थरारक अनुभव द्यावा म्हणून.. विज्ञानाचे महत्त्व आणि वैज्ञानिक दृष्टिकोन समाजाला मिळावा यासाठीही..!! 

नारायण विनायक जगताप, माझी पहिली विज्ञानकथा आणि दुर्गाबाई१९७४ साली अहमदाबाद येथे एक परिसंवाद होता. एका नामवंत वैज्ञानिक संस्थेने त्या परिसंवादाचे आयोजन केले होते. परिसंवादातील वक्ता श्रोत्यांना झोप आणण्याचे काम चोख बजावत होता. मी मात्र त्या व्याख्यानाचा नाद केव्हाच सोडून दिला होता; पण मग वेळ कसा घालवायचा? नेमक्या अशाच एका क्षणी मला असे वाटले, आत्ता आपण कथालेखन का सुरू करू नये? परिसंवादाच्या संयोजकांनी पुरविलेले कागद मी पुढे ओढले आणि लिहिण्यास सुरुवात केली. त्यावेळी वक्त्याचा गोड गैरसमज झाला असेल की, मी त्याच्या लेक्चरच्या नोट्स उतरवत आहे.‘कृष्णविवर’ ही कथा प्रकाशात आली ती अशी. विज्ञानकथा लिहिण्याचा तो माझा पहिलाच प्रयत्न होता. ही कथा मी मराठीत लिहिली. मराठी विज्ञान परिषद, मुंबई या संस्थेने आयोजित केलेल्या विज्ञानकथा स्पर्धेसाठी कथा पाठवावी, असा विचार माझ्या मनात घोळत होता.स्पर्धेच्या संयोजकांनी कथेच्या लांबीबद्दल, शब्दसंख्येबद्दल ज्या अटी घातल्या होत्या, त्यामध्ये माझी ही कथा बसत होती. ‘नारायण विनायक जगताप’ या नावाने मी कचरतच प्रवेशपत्रिका भरली. मी धारण केलेल्या नावाची आद्याक्षरे माझ्या खऱ्या नावाच्या आद्याक्षरांच्या बरोबर उलट्या क्रमाने होती. मराठी विज्ञान परिषदेचे पदाधिकारी माझे नावच काय, पण हस्ताक्षरही ओळखतील, अशी भीती वाटल्याने मी ती कथा माझ्या पत्नीस लिहून काढण्यास सांगितली व स्पर्धेसाठी एका वेगळ्या पत्त्यावरून पाठवून दिली. माझ्या त्या कथेला प्रथम पारितोषिक मिळाल्याचे समजले तेव्हा मला सुखद धक्का बसला. श्रीमती दुर्गाबाई भागवत यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आपल्या अध्यक्षीय भाषणातून माझ्या लिखाणाचा गौरव केला. पुढे तर मुकुंदराव किर्लोस्कर यांनी भविष्यवाणी केली की, पुढे-मागे मी मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषवीन. महान व्यक्तींनी खास प्रसंगी केलेल्या वक्तव्यामुळे नवे प्रवाह निर्माण होण्यास मदत होते, ती ही अशी!

टॅग्स :Jayant Narlikarजयंत नारळीकरMarathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनNashikनाशिक