ऑनलाइन टीम
मुंबई, दि. १ - यंदाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पंजाबमध्ये भरणार आहे. पंजाबमध्ये संत नामदेवांनी भक्तिसंप्रदायाची पताका फडकवली. पंजाबमधलं घुमान हे ठिकाण त्यांची कर्मभूमी आहे. फेब्परुवारीच्या पहिल्या किंवा दुस-या आठवड्यात हे संमेलन होणार आहे. दरम्यान यावर्षी विश्व साहित्यसंमेल दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे पार पडणार असल्याची माहिती अ. भा. साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष माधवी वैद्य यांनी दिली. मार्चच्या पहिल्या आठवड्यात हे संमेलन होईल.
मराठी साहित्य संमेलनासाठी यंदा आठ ते दहा ठिकाणाहून अखिल भारतीय साहित्य परिषदेकडे निमंत्रणे आली होती. यामध्ये बडोदा व घुमान या दोन ठिकाणांचा समावेश होता. यापैकी घुमानवर परिषदेने शिक्कामोर्तब केले आहे. संत नामदेव यांची कर्मभूमी असलेल्या पंजाबमधील घुमानमध्ये मराठी साहित्याचा आवाज दुमदुमणार असल्याचे या संमेलनाचे निमंत्रक संजय नहार यांनी सांगितले.
संत नामदेवांनी मराठीचा प्रसार पंजाबमध्ये केला आणि पंजाबी लोकांना नामदेव व मराठी आपले वाटायला लागले याची आठवण करून देत नहार यांनी मराठी समाजालाही घुमान आपलं वाटायला लागेल अशी आशा व्यक्त केली.शीखांमध्ये मूर्तीपूजा व्यर्ज असली तरी काही सन्माननीय अपवादांमध्ये नामदेवांचा समावेश आहे. फतेहगड साहिबजवळच्या बास्सी पाथना या शहरामध्ये संत नामदेव मंदीर असून त्यात नामदेवांची मूर्ती आहे.