पूज्य साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर : शासन मराठी विषयासाठी आदेशावर आदेश काढत असताना मराठीची गळचेपी कोण करते, हेही तपासून पाहणे गरजेचे आहे. राज्यात १६ हजार मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडल्या आहेत, अशी खंत ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. रवींद्र शोभणे यांनी व्यक्त केली. हल्ली जो डोनेशन देऊ शकतो, तो प्राध्यापक होतो आणि ज्यांच्याजवळ पैसा नाही ते मात्र १० हजारांवर नोकरी करीत असल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.
९७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन प्रताप कॉलेज येथील पूज्य साने गुरुजी साहित्यनगरीत शुक्रवारी झाले. यावेळी ते बोलत होते. डॉ. शोभणे पुढे म्हणाले, एकीकडे आपण मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून आग्रही असतो, परंतु दुसरीकडे मराठी माध्यमांच्या शाळांची अवस्था काय आहे? असा प्रश्नही पडतो. मराठी भाषेसाठी, शाळांसाठी आपण कोणते वेगळे प्रयत्न करतो, हे तपासले पाहिजे. आज राज्यातील प्राथमिक शाळा वाचविणे त्यासाठी वेगळा कृती आराखडा निश्चित करणे अधिक महत्त्वाचे आहे.
दुय्यम स्थानराजभाषा म्हणून आपण ज्या मराठीचे गोडवे गातो, त्या भाषेला अभ्यासक्रमात दुय्यम स्थान देणे ही आपल्या भाषाविषयक उदासीनतेची साक्ष देणारी गोष्ट आहे. यासाठी केवळ शासनाला जबाबदार धरणे यापलीकडे काहीही सांगता येणार नाही, मराठी ज्ञानभाषा व्हावी, अशी भावना मराठी जनतेची आहे. त्यासाठी सर्वप्रथम शासकीय स्तरावरूनच प्रयत्न होणे अत्यावश्यक आहे, असे आग्रही प्रतिपादन डॉ. शोभणे यांनी केले, तसेच मराठी भाषेचे विद्यापीठ रिद्धपूर या ठिकाणी स्थापन झाले, त्याबद्दल त्यांनी महाराष्ट्र शासनाचे जाहीर अभिनंदनही केले.