ठाणे : अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनानंतर आता ठाण्याच्या शिरपेचात अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशनाचा तुरा खोवला जाणार आहे. तब्बल १३ वर्षांनी पुन्हा एकदा हे अधिवेशन ठाण्यात होत असून ते ‘स्वच्छ, सुंदर आणि स्मार्ट ठाणे’ या विषयावर आधारित असेल. ठाण्यात यंदा या आधी ८४ वे मराठी साहित्य संमेलन, पार पडले होते. त्यानंतर ९६ वे. अ. भा. मराठी नाट्य संमेलन यावर्षी पार पडले. त्यापाठोपाठ याचवर्षी डिसेंबरमध्ये ५१ वे अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन पार पडणार आहे. मराठी विज्ञान परिषदेच्या ठाणे विभागाचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त १६, १७ आणि १८ डिसेंबरला गडकरी रंगायतन येथे हे अधिवेशन भरविले जाईल. ठाण्यात होणारे यंदाचे हे चौथे संमेलन आहे. याआधी १९६८, १९८५ आणि २००३ मध्ये ठाण्यात हे अधिवेशन घेण्यात आले होते, अशी माहिती ठाणे विभागाचे कार्यवाह ना. द. मांडगे यांनी दिली. हे अधिवेशन गेल्यावर्षी मुंबईत पार पडले. चर्चासत्र, प्रदर्शन आणि विविध भरगच्च कार्यक्रम हे अधिवेशन रंगणार आहे. अधिवेशनानिमित्ताने निबंध स्पर्धा, कथाकथन स्पर्धा आणि प्रश्नमंजुषा स्पर्धाही घेण्यात येणार आहे. (प्रतिनिधी) ठाणे शहराशी असलेल्या आपल्या नात्याला शब्दरुप देण्यासाठी मराठी विज्ञान परिषदेने ‘ठाणे शहरानुभव’ या विषयावर निबंध स्पर्धा भरवली आहे. स्पर्धा ठाणे शहराच्या कोरड्या वर्णनापुरती मर्यादित राहू नये, केवळ तक्रारीच्या स्वरुपाची असू नये, निबंध लेखन हे शहर सुधारणा करण्यासाठीच्या सूचना अशा स्वरुपाचेही असू नये, निबंधाच्या माध्यमातून ठाणे शहराचे-शहरातील नागरिकांचे व्यक्तिमत्त्व, स्वभाव, वैशिष्ट्य, सामाजिक-सांस्कृतिक वीण, अनुबंध व्यक्त व्हावे अशी अपेक्षा परिषदेने व्यक्त केली आहे. ही स्पर्धा तीन वयोगटांत होणार असून प्रत्येक वयोगटासाठीचे विषय वेगळे असतील.
ठाण्यात १३ वर्षांनी भरणार मराठी विज्ञान अधिवेशन
By admin | Published: September 14, 2016 4:25 AM