शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

मराठीचे पुत्र आम्ही, तिचे पांग फेडू

By admin | Published: January 17, 2016 12:57 AM

पिंपरीतील ज्ञानोबा-तुकोबानगरीत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाच्या वतीने आयोजित केलेल्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची

पिंपरीतील ज्ञानोबा-तुकोबानगरीत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाच्या वतीने आयोजित केलेल्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात आजपासून झाली. या वेळी स्वागताध्यक्ष आणि डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. पी.डी. पाटील यांनी केलेल्या भाषणाचा गोषवारा...मातृभूमीप्रमाणे मराठी भाषेलाही आपण माय मानतो. तिच्या भवितव्याबद्दल अनेक विचारवंत चिंता आणि चिंतन करीत आलेले आहेत. आज जागतिकीकरणाच्या वाढत्या रेट्यात मराठी भाषेपुढे आव्हानं आहेत.माझ्या आणि संमेलनाचं संयोजन करणाऱ्या डॉ. डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या वाटचालीतला हा एक महत्त्वाचा असा ऐतिहासिक क्षण आहे. गेल्या वर्षीचे संमेलन संत नामदेवांच्या वास्तव्यानं पुनित झालेल्या घुमान येथे भरलं होतं आणि हे संमेलनही अशीच गौरवशाली परंपरा लाभलेल्या पिंपरी-चिंचवडनगरीत भरत आहे. ज्ञानेश्वर-तुकारामांच्या वास्तव्याचा दरवळ आणि त्यांच्या आळंदी-देहूचं सान्निध्य लाभलेली ही पुण्यभूमी. महासाधू मोरया गोसावींच्या आध्यात्मिक कार्याची ही कर्मभूमी. छत्रपती शिवरायांच्या अलौकिकत्वानं भारलेली मावळ्यांच्या परिसरातील शिवभूमी, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या मानवमुक्तीचं महान कार्य करणाऱ्या महामानवांच्या वास्तव्याच्या आणि विचारांच्या प्रवाहात न्हालेली ही समताभूमी, नामदार गोपाळ कृष्ण गोखले, लोकमान्य टिळक यांच्यासारख्या नेत्यांच्या राष्ट्रकार्याचा, क्रांतिवीर चाफेकरांसारख्या देशभक्तांच्या बलिदानाचा वारसा लाभलेली ही वीरभूमी, सावित्रीबाई फुले, गोपाळ गणेश आगरकर, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे अशांसारख्या दीपस्तंभाची ही दिशाभूमी, आधुनिक तीर्थक्षेत्र असलेल्या औद्योगिकतेचं मोठं केंद्र असलेली उद्यमभूमी आणि अध्यात्म आणि विज्ञान-तंत्रज्ञान हातात हात घालून चालतात, अशी ही संगमभूमी. अशा या भूमीत भरणाऱ्या या साहित्य संमेलनाला एक विशेष ऐतिहासिक औचित्य लाभलं आहे. मानवमुक्तीचं महान कार्य करणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीचं हे वर्ष आहे. पिंपरी-चिंचवडपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या तळेगावमध्ये डॉ. बाबासाहेबांच्या वास्तव्याच्या आणि कार्याच्या प्रारंभाच्या स्मृती आजही ताज्या आहेत. साहित्य आणि शिक्षण यांना मानवमुक्तीसाठी कार्य करण्याची चिरकाल प्रेरणा त्यांचं जीवनकार्य देत राहील. जीवनाच्या सर्व क्षेत्रांना आणि पैलूंना साहित्य कवेत घेतं. डॉ. डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठ ही आमची देशातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता पावलेली शिक्षणसंस्था आहे. ज्ञानाच्या माध्यमातून सबलीकरण हे ब्रीद घेऊन आमचं विद्यापीठ प्रगतीची वाटचाल करीत आहे. शिक्षण आणि साहित्य ही दोन्ही जीवन घडविणारी क्षेत्रे आहेत. महाराष्ट्राच्या मातीत उभ्या राहिलेल्या आमच्या शिक्षण संस्थेनं मराठी साहित्य-संस्कृतीचं वैभव असलेल्या या साहित्य सोहळ्याचं संयोजकत्व स्वीकारावं, अशी आमची मनापासून इच्छा होती. अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळानं ती मान्य केली. साहित्यिक, साहित्यसंस्था आणि रसिक यांनी दिलेल्या प्रतिसादानं आमचा उत्साह दुणावला. त्याला प्रसारमाध्यमांनी बळ दिलं. जे करायचं ते उत्तम आणि वैशिष्ट्यपूर्ण हा आमच्या विद्यापीठाचा ध्यास असतो. साहित्य संमेलन त्याला अपवाद कसं असणार? याची केवळ वानगी म्हणून सांगतो- देशातल्या विविध भाषांमधील चार ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्रतिभावंत या संमेलनाला हजर आहेत. मराठीच्या प्रांगणात अखिल भारतीय भारतीय भाषा-भगिनींचा असा स्नेहमेळावा आम्ही भरवू शकलो, याचा आम्हाला अभिमान आणि आनंद आहे. विविध भागातले नामवंत साहित्यिक आणि रसिकही आवर्जून उपस्थित राहावेत, यासाठी महाराष्ट्राच्या सर्व भागांमध्ये मी गेलो. किमान २५० ते ३०० साहित्यिकांना व्यक्तिश: भेटून निमंत्रण दिलं. मान्यवर व्यक्तींशी, विविध संस्थांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला, स्वागताध्यक्ष आमच्यापर्यंत येत आहेत, असं प्रथमच घडतं आहे, अशी अनेकांची प्रतिक्रिया होती. सांगली जिल्ह्यात अंत्री बुद्रूक या माझ्या छोट्याशा गावात ग्रामस्थांनी आमचा सत्कार केला. सर्व स्तरातले लोक जमले होते. तरुण वर्गाचा सहभाग वाढावा आणि त्यासाठी विशेष असे कार्यक्रम असावेत, यावर आम्ही भर दिला आहे. न्या. रानडे यांनी पहिलं ग्रंथकारांचं संमेलन भरवलं तेव्हापासून मराठी भाषेच्या जतन-संवर्धनाचा विचार हा साहित्य संमेलनामागचा एक प्रमुख उद्देश राहात आला आहे. कविवर्य माधव ज्युलियन यांनी ‘मराठी असे आमुची मायबोली’ हे अभिमानानं सांगताना ‘हिचे पुत्र आम्ही, हिचे पांग फेडू’ अशी कर्तव्याची जाणीव देणारी प्रतिज्ञा उच्चारली आहे. आमच्या विद्यापीठात मराठीसाठी स्वतंत्र अध्यासन आम्ही निर्माण करणार आहोत. त्यातून आम्ही जे कार्य करू इच्छितो, त्याचं एक प्रतीक ठरावं असा एक महत्त्वाचा प्रयत्न आम्ही या संमेलनाच्या निमित्तानं केला आहे. ‘मराठी भाषा संचित आणि नव्या दिशा’ हा विशेष ग्रंथ आम्ही प्रकाशित केला आहे. मराठी भाषेच्या संदर्भातील समग्र विचाराचा हा प्रयत्न आहे. ज्ञानपीठ पुरस्काराच्या मानकऱ्यांमधील हयात अशा प्रतिभावंत वनीचित्ररूपातील मुलाखती असोत, साहित्यिकांच्या कार्यकर्तृत्वाची झलक दर्शवणारी ‘साहित्यिक दर्पण’ ही रोजनिशी असो, ५ साहित्यिक-सांस्कृतिक संस्थांना ‘गौरवनिधी’ देणं असो किंवा ग्रामीण भागातील १ हजार शाळांना दिलेली भरघोस ग्रंथदेणगी असो, ही सारी आमच्या या उद्दिष्टाच्या मार्गावरची कृतिशील पावलं आहेत. केवळ ४ दिवसांच्या सोहळ्यापुरता आमचा विचार मर्यादित नाही. आमची भूमिका अधिक सखोल आणि गंभीर आहे, हे यातून स्पष्ट होऊ शकेल. प्रत्यक्ष कृतीतूनच त्यांचा उच्चार व्हावा, अशी आमची इच्छा आहे. आज एकीकडे सगळं जग हे गाव होण्याची किमया विज्ञान-तंत्रज्ञानानं केली आहे. जागतिकीकरणानं सगळं विश्व, भारतातील समाजजीवन ढवळून निघत आहे. साहित्याचं परिमाण आणि त्यामुळे स्वरूपही त्यामुळे बदलत जाणं अपरिहार्य आहे. दुसरीकडे जगातील अशांतता, अस्वस्थता आणि त्यामुळे येणारी अस्थिरता आणि हिंसकताही वाढत आहे. अशावेळी तर साहित्यानं मानवतेचे दीप प्रकाशमान ठेवण्याची पूर्वी कधी नव्हती एवढी गरज आहे. माणसाला माणूस बनवतं ते शिक्षण, असं भारताचे माजी राष्ट्रपती, तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणत असत. मानवताधर्माचा उद्गार साहित्यातून सातत्यानं घुमत आला आहे. संवेदनशीलता हा या धर्मातून येणाऱ्या सामाजिक जाणिवेचा गाभा आहे. साहित्याचा सोहळा साजरा करताना आम्ही ही जाणीव विसरू शकत नाही. आपल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी संमेलनात जमा होणाऱ्या निधीत आमची भर घालून एक कोट रुपये आम्ही नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाउंडेशनला देत आहोत. आमच्या दृष्टीने हा झगमगाटाचा विषय नाही, आंतरिक तळमळीचा आविष्कार आहे. आज समाजजीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये तोडणाऱ्या शक्तींचा चिंताजनक प्रभाव वाढताना दिसत आहे. अशा वेळी जोडणाऱ्या शक्तींचा जागर झाला पाहिजे. अटलबिहारी वाजपेयी यांनी म्हटल्याप्रमाणे, परस्परांमध्ये मतभेद असावेत, पण मनभेद असू नयेत. मतभेद म्हणजे शत्रुत्व नव्हे, परस्परद्वेष नव्हे. मनाच्या उन्नयनाशिवाय वैचारिक विशालता आणि सहिष्णुता येत नाही आणि वैचारिक सहिष्णुतेशिवाय शांततामय सहजीवन शक्य नसतं, याची साक्ष इतिहास देत आला आहे. वैचारिक मंथनातून मानवी उन्नतीचा मार्ग प्रशस्त होत जातो, हा इतिहास आहे. साहित्याचा उत्सव अशा मंथनानं संस्मरणीय आणि प्रेरक ठरावा, अशी आशा आहे. साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी गेले काही महिने अखंड झटतो आहोत. आता ते प्रत्यक्ष सुरू होत आहे. परिपूर्णतेचा प्रयत्न आम्ही मन:पूर्वकतेनं केला आहे. तरीही उणिवा राहू शकतात, याची आम्हाला जाणीव आहे. आपण उदार अंत:करणानं उणिवा पोटात घालाव्यात आणि जे चांगलं, भरीव आहे ते रसिकतेनं मनात साठवावं आणि साहित्याचा हा सोहळा आनंदाचा करावा, अशी आमची विनंती आहे. संमेलन सर्व साहित्यिकांचं आणि रसिकांचं आहे. आम्ही केवळ मराठी मनाच्या सद्भावाचे प्रतिनिधी म्हणून संयोजकत्वाची धुरा सांभाळली आहे. त्यातून साहित्य-संस्कृतीच्या विश्वाशी, आपणा सर्वांशी आमचं नातं निर्माण झालं आहे. मराठीच्या धाग्यानं आपण जोडलो गेलो आहोत. संमेलन संपेल, पण हे भाषाबंध यापुढेही कायम राहतील. ज्ञानदेवांच्या शब्दांत, ‘तरी न्यून ते पुरतेअधिक ते सरतेकरुनि घ्यावे’ ही विनंती करतो. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम करणारे माझे सहकारी, कार्यकर्ते, विविध संस्था आणि व्यक्ती, संमेलन सातत्यानं प्रकाशात ठेवणारी प्रसारमाध्यमं आणि प्रचंड संख्येनं उपस्थित असलेले आपण रसिक या सर्वांना धन्यवाद देतो.