राज चिंचणकर,
मुंबई- कलेला भाषा नसते आणि त्यानुसार अनेक नाटकांचे भाषिक आदानप्रदान अधूनमधून होत असते. सध्या मराठी रंगभूमीवर सुरू असलेले ‘कोडमंत्र’ हे नाटकही असेच गुजराती रंगभूमीवरून मराठीत आले आहे आणि यातून मराठी व गुजराती या दोन भाषांचा संगम साधला गेला असताना खुद्द गुजराती रंगकर्मींनी यानिमित्ताने मराठी रंगभूमीला सलाम ठोकला आहे.गुजराती रंगभूमीवरचे ज्येष्ठ दिग्दर्शक राजेश जोशी यांनी हे नाटक गुजरातीतून मराठीत आणले आहे. यानिमित्ताने मराठी रंगभूमीचा अनुभव घेतल्यावर, मराठी रंगभूमी आणि मराठी कलाकारांच्या शिस्तीला मी मनापासून सलाम करतो, असे गौरवोद्गार त्यांनी काढले आहेत. ‘चतुरंग’ प्रतिष्ठानच्या ‘मुक्तसंध्या’ या उपक्रमांतर्गत आयोजित या नाटकाच्या नाट्यावलोकनात त्यांनी जाहीरपणे मराठी रंगभूमीला सलाम करत, यापुढेही मराठीत नाटके करण्याचा मानस व्यक्त केला आहे. आम्ही गुजराती रंगभूमीवर अनेक वर्षे नाटके सादर करीत आहोत; परंतु मराठी रंगभूमीची बात काही औरच असल्याची पावतीही त्यांनी दिली आहे.‘जय हिंद’ संबोधत नमस्कार... : लष्करी पार्श्वभूमीवरच्या या नाटकाच्या सेटवर आल्यावर, या नाटकाशी संबंधित सर्व जण एकमेकांना ‘जय हिंद’ असे संबोधून नमस्कार करत असतात आणि त्यामुळे सेटवर आपोआप वातावरणनिर्मिती होते, असे या नाटकात कर्नलची प्रमुख भूमिका साकारणारे अभिनेते अजय पुरकर आवर्जून सांगतात. या नाटकात लष्करी गणवेशात वावरण्यात एक वेगळीच जादू असल्याचेही ते स्पष्ट करतात.