मुंबई : महाराष्ट्राच्या राजभाषा अधिनियमाच्या (१९६४) कलम १ मध्ये मराठी भाषेचा ‘राजभाषा’ असा सुस्पष्ट नसल्यामुळे या अधिनियमात सुधारणा करणारे विधेयक विधिमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनात मांडण्यात येईल, अशी माहिती मराठी भाषा विभागाचे मंत्री विनोद तावडे यांनी दिली. सध्याच्या अधिनियमात संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ यामध्ये मराठी ही राजभाषा असल्याचा कुठेही स्पष्ट उल्लेख नाही. कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये अनुक्रमे कन्नड, तेलगू आणि तमिळ या अधिकृत राजभाषा असल्याचे म्हटले आहे. परंतु महाराष्ट्र अधिनियमात मराठीबाबत ‘जिचा अंगिकार केला आहे अशी देवनागरी लिपीतील मराठी भाषा असा समजावा असा’ असा संदिग्ध उल्लेख आहे. ही संदिग्धता आता दूर केली जाईल,असे तावडे म्हणाले. महाराष्ट्रात राहणाऱ्या तसेच नोकरी करणाऱ्या व्यक्तीला मराठी भाषा आलीच पाहिजे, अशी सक्ती करण्यापेक्षा आग्रह व निग्रह महत्त्वाचा आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठीचे शिक्षण देणे आवश्यक आहे, हे तत्त्वत: मान्य आहे. शाळांमध्ये मराठी विषय १०० गुणांचा म्हणून शिकवायचा की ५० गुणांचा म्हणून शिकवायचा किंवा मराठी विषयाचे गुण-परीक्षा न ठेवता शिक्षण द्यायचे, याबाबत शिक्षण तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात येईल, असेही तावडे यांनी सांगितले.
मराठी होणार राजभाषा
By admin | Published: June 18, 2015 2:48 AM