ठाणे : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा लवकरच देण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे उच्च शिक्षण व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी दिले. ते ठाण्यात ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’च्या राज्यस्तरीय ‘प्रतिभा संगम’ या संमेलनात बोलत होते.ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या प्रांगणात सुरू असलेल्या या संमेलनात मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या मागणीला पाठिंबा दर्शवण्यात आला. या संदर्भातल्या ठरावाची प्रत संमेलनाच्या वतीने परिषदेचे प्रदेश मंत्री विवेकानंद उजळंबकर यांनी तावडे यांना दिली. त्याच अनुषंगाने भाष्य करताना तावडे म्हणाले, ‘साहित्यिकांनीच समाज घडविण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. मराठी भाषेच्या विकासासाठी केवळ दुकानांवरच्या पाट्या बदलून भागणार नाही. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणे गरजेचे आहे. त्यामुळे नवोदित साहित्यिकांना अनुदान मिळेल.’ मराठी भाषा ही दोन हजार वर्षांपूर्वीची असूनही तिला अभिजात दर्जा अद्यापही न मिळाल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. त्यामुळे फेब्रुवारी २०१५पर्यंत आपण मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देऊ, असे आश्वासन त्यांनी या वेळी दिले. (प्रतिनिधी)
‘मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देणार’
By admin | Published: December 15, 2014 3:55 AM