लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ‘ब्ल्यूटूथ’, ‘ब्लॉग’, ‘क्लोन’ अशा संज्ञांना मराठीत काय म्हणतात, असे विचारले तर कपाळावर आठ्या पडतात. मात्र लवकरच या आणि अशा अनेक कठीण शब्दांना सहज सोपे मराठी शब्द उपलब्ध होणार आहेत. मराठी भाषा विभागाने भाषा संचालनालयांतर्गत यापूर्वीच परिभाषा कोशांची निर्मिती केली आहे. आता संचालनालयाने नवीन १० विषयांची परिभाषा कोशनिर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे.कृषी अभियांत्रिकी, सूक्ष्मजीवशास्त्र व माहिती तंत्रज्ञान, जल व भूमी व्यवस्थापनशास्त्र, सागर विज्ञानशास्त्र, योगशास्त्र, आहारशास्त्र, जैव तंत्रज्ञानशास्त्र, जनसंवाद आणि आपत्ती व्यवस्थापनशास्त्र विषयांतील नव्या १० परिभाषा कोशांची निर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी आता नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयाप्रमाणे, उपसमित्यांच्या प्रतिनिधींची लवकरच नियुक्ती करण्यात येईल.मराठीचे शब्द वैभव वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार मराठी भाषा विभागाने मराठी वैज्ञानिक शब्दावली तयार करण्याचे काम भाषा सल्लागार मंडळाकडे सोपविले आहे. या कामासाठी भाषा सल्लागार मंडळाला सहकार्य करण्याकरिता प्रत्येक वैज्ञानिक व तांत्रिक विषयाकरिता त्याच्या सर्व शाखा व उपशाखांकरिता एक-एक उपसमिती नेमण्यात आली आहे.
मराठीचे शब्द वैभव वाढणार!
By admin | Published: June 27, 2017 2:09 AM