नवी मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांप्रमाणे मुंबईत मराठी माणसाचा टक्का जतन करण्याची गरज माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली. व्यापारी संघटनेच्या कार्यक्रमनिमित्ताने ते एपीएमसी येथे उपस्थित होते. यावेळी १०७ हुतात्म्यांना स्मरण करत त्यांच्या त्यागातून निर्माण झालेले मराठी भाषिकांचे राज्य टिकवण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.एपीएमसी येथे दी फ्रूट अँड व्हेजिटेबल मर्चंट्स असोसिएशनच्या वतीने संघटनेच्या अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी मंत्री शरद पवार प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी पवार यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सांगायचे त्याप्रमाणे मुंबईत मराठीचा टक्का जतन व्हावा अशी गरज व्यक्त केली. मात्र इतर भाषिकांना आपला विरोध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. परंतु १०७ हुतात्म्यांच्या त्यागातून मराठी भाषिकांचे राज्य निर्माण झालेले असून, ते जतन करण्याची सर्वांची जबाबदारी असल्याचेही त्यांनी सुचवले. याचवेळी शेतकरी कुटुंबातील व्यक्तींनाही उद्योग क्षेत्रात उतरण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. पाणीप्रश्न सुटून शेती होत असेल तर कुटुंबातील एकाने ती करा व दुसऱ्याने उद्योगाचा वसा नजरेसमोर ठेवत देशभरात व्यवसाय करण्याचा सल्ला दिला. तर शेतकऱ्यांच्या पुढच्या पिढीने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याचीही गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच शेतकरी व व्यापाऱ्यांसंबंधीचे निर्णय एकटे सरकार घेवू शकत नसून, ते धोरणात्मक निर्णय असल्याचे सांगत बाजार समितीमधून फळे भाजीपाला वगळण्याच्या निर्णयातून व्यापाऱ्यांना दिलासा दिला.सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही यावेळी शेतकरी व व्यापाऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय घेतला जाणार नसल्याचे सांगितले. यामुळेच चर्चेविना या अधिवेशनात कायदा मंजुरीसाठी येणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी पालकमंत्री एकनाथ शिंदे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, माजी गृहमंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री गणेश नाईक, महापौर सुधाकर सोनवणे, आमदार शशिकांत शिंदे, संदीप नाईक, नरेंद्र पाटील, मंदा म्हात्रे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मुंबईत मराठीचा टक्का जतन व्हावा
By admin | Published: March 12, 2016 4:32 AM