मुंबई - तेलंगणा सरकारने 4 आयपीएस अधिकाऱ्यांना पदोन्नती दिली असून त्यामध्ये एका महाराष्ट्रपुत्राचा समावेश आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डीचे सुपुत्र आयपीएस महेश भागवत यांना तेलंगणाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकपदाची जबाबदारी मिळाली आहे. तेलंगणा सरकारचे मुख्य सचिव सोमेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत याबबातची माहिती दिली. महेश भागवत हे सध्या रचकोंडाचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. आता, राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचाकपदी विराजमान होत आहेत. ग्रामीण भागातून पुढे आलेल्या एका मराठी अधिकाऱ्याची ही झेप महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे.
महेश भागवत यांच्यासह आयपीएस अधिकारी स्वाती लाकरा, वी वी श्रीनिवास राव आणि डॉ. आर.एस. प्रविण कुमार अतिरिक्त पोलीस महासंचालकपदावर पदोन्नती देण्यात आली आहे. हे चारही अधिकारी 1995 च्या बॅचचे पास आऊट आहेत.
पाथर्डी ते हैदराबाद
महेश मुरलीधर भागवत हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी गावचे आहेत. शिक्षक वडिलांच्या या मुलाने सिव्हील इंजिनिअरींगचे शिक्षण घेतले होते. आपल्या इंजिनिअरिंगच्या पदवीनंतर 1993-94 मध्ये महेश भागवत हे पुण्यातील टाटा मोटार्स या कंपनीत कामाला होते. पार्थर्डीसारख्या ग्रामीण भागातून पुढे येत परिस्थितीशी दोनहात करत भागवत यांनी आयपीएस बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून स्पर्धा परीक्षांची तयारी केली. आपल्या जिद्दीच्या आणि मेहनतीच्या जोरावर भागवत यांनी आयपीएस परीक्षा पास केली. गेल्या अनेक वर्षांपासून ते आंध्र प्रदेशमध्ये कार्यरत आहेत. विशेष म्हणजे तेलंगणा राज्य निर्मित्ती झाल्यानंतर त्यांना तेलंगणाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे, सध्या ते तेलंगणातील रचकोंडा येथे पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. आता, तेलंगणा राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून ते लवकरच पदभार स्विकारतील.
महेश भागवत यांनी पोलिस दलात आपल्या कामाचा वेगळाच ठसा उमटविला आहे. महिला आणि बाल तस्करीविरुद्ध त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. गेल्या 13 वर्षांपासून ते मानवी तस्करीविरोधात लढत आहेत. या तेरा वर्षांमध्ये आंध्र प्रदेश आणि तेलंगणात त्यांनी व त्यांच्या पथकासोबत शेकडो बालमजुरांची व महिलांची सुटका केली असून कित्येक देहविक्री व्यवसायही बंद केलेत. महेश भागवत यांच्या कामगिरीची दखल घेऊन अमेरिकेनेही त्यांचा सन्मान केला आहे. अमेरिकेने ‘ट्रॅफिकिंग इन पर्सन रिपोर्ट हिरो अवार्ड’ देऊन महेश मुरलीधर यांचा गौरव केला आहे. एक संवेदनशील आणि जिज्ञासू अधिकारी म्हणून महेश भागवत हे गावापासून ते राजधानी दिल्लीपर्यत परिचित आहेत.
युपीएससी आणि एमपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ते 24*7 सेवा देतात. त्यामुळेच, युपीएससी आणि एमपीएससी स्पर्धा परीक्षांमधून अधिकारी बनलेले महाराष्ट्रातील कित्येक युवक अधिकारी त्यांना आपला गुरु मानतात. तेलंगणात असतानाही मायभूमी महाराष्ट्रावर त्यांचं विशेष प्रेम आहे. सातत्याने नवं शिकण्याच्या, आपल्या जिज्ञासूपणामुळेच त्यांनी आंध्र प्रदेशात गेल्यानंतर तेलुगू भाषा शिकली असून ते अस्सखलीत तेलुगू बोलतात. तेलुगू भाषा शिकून त्यांनी तेथील नक्षली आणि आदिवासी भागात मोठं काम केलं आहे. तर, नुकतेच कोरोना महामारीच्या काळातही त्यांनी आपल्यातील संवेदनशील अधिकाऱ्याचे दर्शन घडवले आहे.
तेलंगणात 40 हजार पेक्षा जास्त गरीब अन् गरजू लोकांना जेवण पुरविण्याच काम त्यांच्यामार्फत त्यांच्या पथकाने केल आहे. तर, स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या मूळगावी पोहोचविण्यासाठीही त्यांनी पुढाकार घेऊन मोहिम राबवली. यासह, महामारीच्या संकटात अन्नछत्र चालविणाऱ्या आणि गरजूंना मदत करणाऱ्या संघटना व संस्थांचा सन्मान करुन त्यांचा विधायक कामासाठी उत्साह वाढविण्याचं कामही त्यांनी केलंय. एका तालुक्यातून पुढे येऊन राज्याच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकपदापर्यंतचा भागवत यांचा प्रवास देशातील विशेषत: महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणांसाठी प्ररेणादायी आहे.