संघटनात्मक बदलांवर चर्चा : ३७० कलमावर ठाम राहण्याचे निर्देशनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला अवघे काही दिवस उरले असताना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी ऐन धुळवडीच्या दिवशी संघ मुख्यालयाला भेट दिली. दिवसभरात शहा यांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्यासमवेत संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली. सुमारे ९ तास शहा संघ मुख्यालयात होते. या वेळी संघ आणि भाजपातील संघटनात्मक बदलांवर सखोल चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर शहा यांनी दुसऱ्यांदा संघस्थानाला भेट दिली. शहा यांचे सकाळी ७ वाजताच्या सुमारास नागपूर विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर सकाळी १० वाजता ते महाल परिसरातील संघ मुख्यालयात पोहोचले. या वेळी त्यांच्यासमवेत भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस रामलाल हेदेखील होते. सकाळच्या सुमारासच बैठकांचे सत्र सुरू झाले. १३ मार्चपासून नागपुरात संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभा सुरू होणार असल्याने संघाचे वरिष्ठ पदाधिकारी मुख्यालयातच आहेत. सुरुवातीला सरसंघचालक, सरकार्यवाह व सहसरकार्यवाह दत्ताजी होसबळे यांनी शहा यांच्याकडून पक्षातील विविध मुद्द्यांसंदर्भात सखोल चर्चा केली. याप्रसंगी संघ व भाजपामध्ये समन्वयाची भूमिका पार पाडणारे सहसरकार्यवाह कृष्णगोपालदेखील उपस्थित होते. यात सर्वांत जास्त भर होता तो जम्मू व काश्मीरमधील स्थितीवर. सत्तास्थापनेनंतर ३७० कलम रद्द करण्याच्या भूमिकेसंदर्भात पक्षाचे धोरण काय असायला हवे यावर संघ पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. पक्षाने आपली भूमिका सोडता कामा नये. जर पक्ष भूमिकेपासून दूर झाला तर जनतेत चुकीची प्रतिमा निर्माण होईल व पुढील निवडणुकांमध्ये याचा फटका बसू शकतो हा स्पष्ट संदेश या वेळी शहा यांना देण्यात आला. सोबतच भूसंपादन विधेयकावरून निर्माण झालेल्या वादासंदर्भात सरसंघचालकांनी संघाच्या अपेक्षा व्यक्त केल्या. संघ परिवारातील अनेक संघटना या विधेयकातील तरतुदींच्या विरोधात आहेत. संघ-भाजपाचे मिशन बिहारदिल्ली निवडणुकांमधील पराभवावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. जनतेला सरकारकडून अपेक्षापूर्ती हवी आहे. जनतेला गृहीत धरले तर इतर राज्यांमध्येदेखील दिल्लीची पुनरावृत्ती व्हायला वेळ लागणार नाही, असे थेट बोल सरसंघचालकांनी या वेळी शहा यांना सुनावले. पक्षातील नेत्यांवर नियंत्रण आणण्याचीदेखील सूचना करण्यात आली. काही महिन्यांवर असलेल्या बिहार निवडणुकांसंदर्भातील रणनीतीच्या प्रारूपावरदेखील चर्चा झाली. लवकरच दिल्ली येथे यासंदर्भात व्यापक बैठक होणार असल्याची माहिती संघाच्या उच्चपदस्थ सूत्रांनी ‘लोकमत’ला दिली.
शहांचे मॅरेथॉन बौद्धिक
By admin | Published: March 07, 2015 2:09 AM