मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील अनेक ठिकाणी किमान तापमानाची नोंद २० अंश सेल्सिअस नोंदविण्यात येत आहे. किमान तापमानाचा हा कल आणखी २४ तास कायम राहील. त्यानंतर मुंबईच्या किमान तापमानात वाढ नोंदविण्यात येईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. दुसरीकडे राज्याच्या बहुतांश भागात कमाल तापमानात वाढ नोंदविण्यात येत असून, मराठवाड्यात कमाल तापमानाने ३४ अंश सेल्सिअसचा आकडा पार केला आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या उपनगरात किमान तापमान २० अंश नोंदविण्यात येत आहे. यात नॅशनल पार्कलगतच्या परिसराचा समावेश आहे. विशेषत: रात्री आणि पहाटे किमान तापमानात बऱ्यापैकी घसरण होत आहे. त्यामुळे मुंबईकरांना अद्यापही पहाटे थंडीचा अनुभव घेता येत आहे. दुसरीकडे दुपारी कडाक्याचे ऊन पडत आहे. मुंबईचे कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस असले तरीदेखील उन्हाचे असह्य चटके मुंबईकरांना बसत आहेत. सूर्याचा प्रकोप दुपारच्या सुमारास वाढत असल्याने दुपारी घराबाहेर पडणे मुंबईकरांना नकोसे वाटत आहे. अनेक जण दुपारी घराबाहेर पडणे टाळत आहेत.
राज्याचा विचार करता विदर्भास देण्यात आलेला पावसाचा इशारा अद्याप कायम आहे. तर कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र येथे हवामान कोरडे राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. मुंबईचा विचार करता शुक्रवारी मुंबई काही अंशी ढगाळ राहील, अशी शक्यता असून, गुरुवारी सकाळीदेखील मुंबई काही प्रमाणात का होईना ढगाळ नोंदविण्यात आली होती.