ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. १७ - दुष्काळ, अवकाळी, गारपीट आणि पूर्वमोसमी पाऊस अशा चक्रव्यूहात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. सततची नापिकी, दुष्काळ व कर्जबाजारीपणामुळे नैराश्य येऊन मराठवाड्यात या वर्षीच्या सुरवातीच्या ४३ दिवसात १२४ शेतकऱ्यांनी मृत्युला कवटाळले आहे. म्हणजेच दिवसाला सरासरी तीन शेतकऱ्यांनी आयुष्य संपवलं आहे.
मराठवाडा विभागीय आयुक्ताच्या कार्यालयातून मिळालेल्या आकडीवारीनुसार या वर्षीच्या १२ फेब्रुवारी पर्यंत मराठवाठ्यात १२४ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. मराठवाड्यात २०१५ मध्ये ११३० तर २०१४ मध्ये ५५१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. प्रत्येक वर्षाला हा ग्राफ वाढत असल्याचे दिसते आहे.
गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांच्या आत्महत्येची विविध कारणे सांगितली जात आहेत. त्यात दुष्काळ, अवकाळी, गारपीट आणि पूर्वमोसमी पाऊस, पाण्याचे तुरक प्रमाण, नापीक जमीन शेतकऱ्यांचा कर्जबाजारी पणा अशी अनेक प्रमुख कारणे आहेत.