औरंगाबाद : राज्यात २३ जूनपासून प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली असली तरी मराठवाड्यातील प्रशासन अजुनही जनजागृतीतच व्यस्त आहे. मराठवाड्याची राजधानी असलेल्या आणि शिवसेनेचीच सत्ता असलेल्या औरंगाबाद महापालिकेने नऊ दिवसांत केवळ ३७ हजारांचा दंड वसूल केला आहे. तुलनेने, नांदेड, लातूर, उस्मानाबाद आणि जालना जिल्ह्यात चांगली कारवाई ढाली असून लाखावर दंड वसूल करण्यात आला आहे.कॅरिबॅग बंदीसाठी औरंगाबाद महापालिकेने झोननिहाय नऊ पथके तयार केली आहेत. मागील आठ दिवसांमध्ये या पथकांनी केवळ ३७ हजार रुपये दंड वसूल केला. या कारवाईअंतर्गत ८४ किलो कॅरिबॅगचे संकलन करण्यात आले असून २० किलो कॅरिबॅग जप्त करण्यात आल्या. कॅरिबॅग बंदीसाठी नेमलेल्या पथकांनी व्यापाऱ्यांवर थेट दंडाचा बडगा उगारण्यापेक्षा जनजागृतीवर अधिक भर दिला आहे. लातूर जिल्ह्यात आतापर्यंत चार टन प्लास्टिक जप्त करण्यात आले असून, ५० व्यापाºयांकडून १ लाख ६२ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.बीड जिल्ह्यात आतापर्यंत २५ कारवाया करण्यात आल्या. यात ४४५ किलो प्लास्टिक जप्त केले असून २५ जणांकडून एकूण ४२ हजार २०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल पावणेसात टन प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे़ जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये जप्त केलेले प्लास्टिक २५ किलोंच्या आसपास आहे़ या प्लास्टिक विक्रेत्याकडून आतापर्यंत पावणेदोन लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे़ परभणी जिल्ह्यात ८ ठिकाणी कारवाई करीत ४० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच मानवत शहरात साडेतीन क्विंटल प्लास्टीक जप्त करण्यात आले. जालना नगर पालिकेने २० व्यापाºयांना प्रत्येकी पाच हजार रूपयांचा दंड आकारला असून, जवळपास १५ क्विंटल प्लास्टिक जप्त केला आहे. हिंगोलीत चार व्यापाºयांकडून ५ हजार रुपये प्रमाणे २० हजार रुपये दंड आणि ७ क्विंटल ८० किलो प्लास्टिक जप्त केले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील पाच नगरपरिषदांनी २० व्यापाºयांविरूद्ध कारवाईचा बडगा उगारला. त्यांच्याकडून प्रत्येकी पाच हजार रूपये या प्रमाणे १ लाख रूपये दंड वसूल केला आहे.
प्लास्टिकबंदीत मराठवाडा चार ‘कदम’ मागे ! नाममात्र कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2018 6:10 AM