बेळगाव : सीमाप्रश्नाचा ठराव न मांडल्याबद्दल आपली भूमिका नगरसेवकांनी व्यक्त करावी, म्हणून शहर महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या बैठकीला ३२ मराठी भाषिक नगरसेवकांपैकी एकही नगरसेवक मराठा मंदिर येथील बैठकीला उपस्थित राहिला नाही. महानगरपालिकेत सीमाप्रश्नाचा ठराव न मांडल्याबद्दल अनेक नगरसेवकांना त्यांच्या भागातील मराठी भाषिकांनी जाब विचारला होता. काळ्या दिनाच्या मिरवणुकीत महापौर आणि उपमहापौर यांच्यासह अनेक नगरसेवक सहभागी झाले नव्हते. त्यामुळे काळ्या दिनाच्या मिरवणुकीनंतर महापौर महेश नाईक यांच्या घरावर मोर्चा काढण्यात आला होता. उपमहापौर रेणू मुतगेकर यांनी तर माफीपत्र लिहून दिले होते. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीने नगरसेवकांनी आपली भूमिका पदाधिकारी आणि माजी महापौर यांच्यासमोर स्पष्ट करावी म्हणून बैठक बोलावली होती. नगरसेवकांच्या घरी जाऊन त्यांना बैठकीचे पत्र देऊन सही घेण्यात आली होती. बैठकीला माजी महापौर मालोजी अष्टेकर, गोविंद राउत, नीलिमा चव्हाण यांच्यासह शहर अध्यक्ष दीपक दळवी, प्रकाश मरगाळे उपस्थित होते; पण एकही नगरसेवक बैठकीकडे फिरकलाच नाही. कोणाच्याही मनात नगरसेवकांविषयी राग नाही, असे मत मराठी नगरसेवकांचे गटप्रमुख किरण सायनाक यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र एकीकरण समितीने बोलाविलेल्या बैठकीत एकही नगरसेवक उपस्थित न राहिल्यामुळे मराठी भाषिक जनतेतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. मराठी भाषा, अस्मिता जपण्यासाठी आणि सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी निवडून दिलेल्या नगरसेवकांच्या भूमिकेबद्दल सर्वसामान्य मराठी भाषिक जनतेत नाराजी आहे. (प्रतिनिधी)
मराठी नगरसेवक विसरले सीमाप्रश्नाची अस्मिता
By admin | Published: November 07, 2014 12:33 AM