ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. २२ - स्वतंत्र विदर्भ आणि मराठवाड्याच्या विषयावरुन भाजप व शिवसेनेत रण पेटले असून त्याचे पडसाद आज नाशिकमध्ये उमटले. वेगळ्या मराठवाड्याचे कथीत समर्थन महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी नाशिकमध्ये केले, असा आरोप करीत सायंकाळी भाजपच्या महिला मेळाव्यात शिवसैनिकांनी घुसून धुडगूस घातला. या कार्यक्रमात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत खुर्च्या उलटून टाकत कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला.
या प्रकारानंतर घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केल्यानंतर वातावरण तणावाचे निर्माण झाले. दरम्यान, दोषींवर कारवाई करण्याची मागणी भाजपने केली आहे.
महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी स्वतंत्र विदर्भापाठोपाठ स्वतंत्र मराठवाडा हवा असे विधान केल्यानंतर वातावरण तापले असताना, नाशिकमध्ये आलेल्या महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांना याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी असा आग्रह पत्रकारांनी धरला. त्यामुळे या विषयावर बोलायचे नाही असे सांगतानाही अखेरीस त्यांनी मराठवाडा स्वतंत्र व्हावा ही जूनीच मागणी असल्याचे सांगितले. त्यानंतर माध्यमांमधून ही माहिती सर्वत्र प्रसारीत झाल्यानंतर शिवसैनिकांनी गोंधळाची व्यूहरचना केली.
सायंकाऴी नाशिक- पुणे रोडवर एका महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसैनिकांनी कार्यक्रमात घुसून धुडगूस घातला. तसेच, या कार्यक्रमात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत खुर्च्या उलटून टाकत कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला.