मुंबई : आमदार देवयानी फरांदे यांच्या याचिकेवर त्वरित सुनावणीस नकार दिल्याने मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळण्याच्या मार्गातील मोठा अडथळा दूर झाला आहे.
आज जिल्हाधिकाऱ्यांची बैठक होणार होती. ती दोन दिवस लांबणीवर टाकण्यात आली आहे. जायकवाडीमध्ये अन्य धरणांतून मराठवाड्याला 9 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे खात्याने घेतला होता. मात्र, याला मोठा विरोध होत होता. मराठवाड्यात पाणी नाही, परंतू जेथे पाणी मिबलक आहे तिथेही दुष्काळ ओढवेल आणि हातातोंडाशी आलेली पिके जळून जातील, असा आरोप विरोधकांनी केला होता.
या प्रकरणी आमदार देवयानी फरांदे यांनी उच्च न्यायालयात मराठवाड्याला पाणी न देण्याबाबत याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यास नकार दिला. तसेच पुनर्विचार याचिका दाखल करण्यास किंवा सर्वोच्च न्यायालयात जाण्यास उच्च न्यायालयाने सांगितले. दिवाळीच्या सुटीनंतर याचिकेवर सुनावणी घेण्यात येईल, असेही न्यायालयाने सांगितले.