लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : चार वर्षांच्या दुष्काळानंतर गेल्यावर्षी चांगला पाऊस झाल्याने मराठवाड्यातील बळीराजा काहीसा सुखावला. पण यंदा पुन्हा मराठवाड्याला दुष्काळकळा जाणवू लागल्या आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यात दमदार पाऊस झाल्याने आठही जिल्ह्यांत पेरण्या आटोपण्यात आल्या. मात्र नंतर पावसाने पाठ फिरविल्याने बळीराजाचे जीवन वेदनादायी झाले आहे.औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ३१.६७ टक्केच पाऊस झाला असून खरिप हंगाम धोक्यात आला आहे. जायकवाडी वगळता जिल्ह्यातील एकाही जलसाठ्यात पाणी वाढलेले नाही. पैठण तालुक्यांत ६० टक्के तर गंगापूर तालुक्यातील ७५ टक्के पेरणी वाया गेल्यात जमा आहे.वैजापूर तालुक्यात ४० टक्केक्षेत्रावर दुबार पेरणी करावी लागली. एक-दोन दिवसात पाऊस न आल्यास तिथेही गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे.जालना जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या १००.५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. म्बीड जिल्ह्यात जुलैअखेर ११५ टक्के पेरण्या झालेल्या आहेत. मात्र पावसाने मोठी ओढ दिल्याने हलक्या जमिनीवरील पिकांमध्ये घट होण्याची शक्यता वाढली आहे.हिंगोली जिल्ह्यात यंदा ३.८४ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली असून पावसाने ओढ दिल्याने पिके माना टाकू लागली आहेत. तर परभणी जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये ४ लाख ५२ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून, येथेही पिके करपू लागली आहेत.उस्मानाबाद जिल्ह्यातील तब्बल ४ लाख ९६ हजार ४२२ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे़ येथे २८६ मिमी पावसाची नोंद झाली असून, सरासरी ३७ टक्क्यांपर्यंत पाऊस झाला आहे़पाच कर्जबाजारी शेतकऱ्यांची आत्महत्यामराठवाड्यातील पाच कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने हा परिसर हादरून गेला आहे. परभणीमधील शिवाजी जोगदंड (४५), पूर्णा तालुक्यातील अनिल रमेश शिंदे (२३) बीडमध्ये बिभीषण रामराव धस (३०) आणि दत्तात्रय बब्रुवान दातार (४५) तर नांदेडमधील रोहिदास मोहन जाधव (५०) या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.नांदेड जिल्ह्यावर जलसंकटनांदेड जिल्ह्यात पावसाअभावी भीषण जलसंकटाची परिस्थिती उद्भवली असून ५ आॅगस्टपर्यंत केवळ २९ टक्के पाऊस जिल्ह्यात झाला आहे.लातूरमध्ये १४.१८ टक्के उपयुक्त पाणीलातूर जिल्ह्यात पावसाने दडीने खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. आठ मध्यम प्रकल्पांत केवळ १४.१८ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.
मराठवाड्याला दुष्काळकळा! आठही जिल्ह्यांत गंभीर परिस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2017 4:09 AM