- यदु जोशीमुंबई - राज्य मंत्रिमंडळाची बैठक येत्या १६ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार असून तीत हजारो कोटी रुपयांचे पॅकेज मराठवाड्याच्या विकासासाठी देण्यात येणार आहे. मंत्रिमंडळ निर्णयांव्यतिरिक्त वेगळ्या घोषणाही मुख्यमंत्री शिंदे करतील. त्या दृष्टीने मंत्रालयात हालचाली सुरू आहेत.
राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी सर्व विभागांच्या सचिवांना गेल्या आठवड्यात पत्र पाठवून मराठवाड्याच्या प्रगतीसाठी कुठले निर्णय व्हायला हवेत, यासाठीचे प्रस्ताव मागविले होते. २० विभागांकडून अडीचशेहून अधिक प्रस्ताव आले आहेत. वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रालयात झालेल्या मंत्री पातळीवरील बैठकीत याविषयी चर्चा झाली. या बैठकीला धनंजय मुंडे, अब्दुल सत्तार, अतुल सावे, संजय बनसोडे हे मंत्री उपस्थित होते. निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी कालबद्ध कार्यक्रमही जाहीर करण्याचे बैठकीत ठरले.
बैठकीसाठी भरगच्च विषय मंत्रिमंडळ बैठकीत किमान ३० निर्णय मराठवाड्यासाठी होतील, असे सूत्रांनी सांगितले. त्यात कृषी, आरोग्य, शिक्षण, उद्योग, कौशल्य विकास आणि सिंचन क्षेत्रासंबंधी महत्त्वाचे निर्णय होतील. सध्या जेवढ्या विषयांची छाननी करण्यात आली आहे ते १६ हजार ४०० कोटी रुपये खर्चाचे आहेत. याशिवाय मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे पत्र परिषदेत घोषणा करण्याची अपेक्षा आहे, ते विषय १६ हजार ७८० कोटी खर्चाचे आहेत. अर्थात दोन्हींबाबत आणखी छाननी केली जाईल आणि नंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या मान्यतेनंतर अंतिम स्वरुप दिले जाईल.
सिंचनाची नवीन योजना मराठवाड्यासाठी सिंचनाची नवीन योजना जाहीर केली जाईल. छत्रपती संभाजीनगरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल, पैठणच्या संत ज्ञानेश्वर उद्यानाचा कायापालट, मराठवाडा मुक्ती संग्रामात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या महनीय व्यक्तींचे त्यांच्या गावी स्मारक, तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिराचा विकास, मराठवाड्यातील जलसंपदा प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता, नवीन न्यायालये, नांदेडमध्ये शासकीय कृषी महाविद्यालयाची उभारणी, ज्योतिर्लिंगांच्या मंदिरांसह महत्त्वाच्या धार्मिक स्थळांचा विकास, रस्ते विकास, आरोग्य सुविधांची निर्मिती आदींबाबत निर्णयाची शक्यता आहे.