- प्रमोद गवळी, नवी दिल्ली
महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यात पाण्यासाठी हाहाकार माजलेला असला तरी तेथे केवळ १४० फूट खोल बोअरिंग खोदल्यावर पाणी लागते, असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. जल संसाधन, नदी विकास व गंगा संरक्षण मंत्रालयाअंतर्गत येणारे केंद्रीय भूजल मंडळ प्रादेशिक स्तरावर वर्षातून चार वेळा भूजल पातळी निगराणी करीत असते. लातूर जिल्ह्याच्या उदगीर तालुक्यातील नागलगाव येथे केवळ १४० फूट खोल (४५.६२ मीटर) बोअरिंग केल्यावर पाणी लागते, असे निगराणीतून स्पष्ट झाले आहे. भूजल मंडळाने ही पातळी ‘कमाल’ असल्याचेही जाहीर केले आहे. १४० फुटापेक्षाही कमी खोलात पाणी लागू शकते असा याचा अर्थ होतो. हे रीडिंग जानेवारी (२०१६) मध्ये घेण्यात आले. नागलगावाला मानक ठरवून मंत्रालयाने मराठवाड्यात भूजल पातळी सामान्य असल्याचे मानले आहे. चिंता करण्याचे कारण नाही, असे मंत्रालयाला म्हणायचे आहे.केंद्रीय जलसंसाधन राज्यमंत्री प्रा. सांवरलाल जाट यांनी राज्यसभेत दिलेल्या उत्तरावरून ही बाब समोर आली आहे. राज्यसभेतील काँग्रेसचे खासदार विजय दर्डा यांनी या संदर्भात प्रश्न विचारला होता. आता अशा प्रकारच्या निराधार प्रशासकीय उत्तरावर काय बोलायचे?मराठवाड्यातील सध्याची परिस्थिती काही लपलेली नाही. आज लातूर जिल्ह्यातील कोणत्याही गावात ३५० फूट बोअरिंग केल्यानंतरदेखील पाण्याचा पत्ता लागत नाही. भूजल मंडळाने सादर केलेला आकडा (१४० फुटांवर पाणी लागण्याबाबतचा) एकतर नदी किंवा टेकडीचा पायथा असलेल्या स्थळाचा आहे.नागलगाव या पर्वतीय भागात पाऊसदेखील साधारण बऱ्यापैकी पडतो. नागलगावसारखीच स्थिती अख्ख्या मराठवाड्याची स्थिती होय, असे मानले तर लातूर येथे मिरजमधून रेल्वेने पाणी आणण्याची आवश्यकताच काय होती, असा प्रश्न निर्माण होतो. परंतु संपूर्ण मराठवाड्यातच किमान भूजल पातळी ५०० फूट खोल गेलेली आहे, ही वस्तुस्थिती आहे.समुद्र सपाटीपासून 1070मीटर उंचीवर वसलेल्या लातूर जिल्ह्यातील औसा या तालुक्यात सध्या पाण्यासाठी लोकांना काय काय करावे लागते हे पाहिले तर तेथील परिस्थितीचा अंदाज येईल.