नामदेव कुंभारमुंबई, दि. २६ - राज्यातील विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील जनता दुष्काळाने होरपळत आहे. लातूरमध्ये मोठय़ा प्रमाणात त्याच्या झळा बसत असल्याने सरकारने मालगाडीतून या जिल्ह्याला पाणीपुरवठा करण्याचे काम युद्धातळीवर सुरु आहे. दुष्काळ कोणालाही आवडत नाही. पण गेल्या काही वर्षापासून ऋतुमानाचे चक्र उलटे फिरत असल्याने हे सगळे काही घडत आहे. लातूरसह मराठवाड्यातील लोक आज भीषण दुष्काळला सामोरं जात आहे. मराठवाड्यातील दुष्काळाची दाहकता पाहता त्याला टँकरवाडा!....म्हणनेच योग्य वाटेल. मराठवाडा विभागातील सुमारे २४०० गावे आणि ८४५ वाड्यांना ३२०० टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. मराठवाड्यातील भीषण दुष्काळाचे चित्र लोकमतचे छायाचित्रकार दत्ता खेडेकर यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहे. त्या छायाचित्रामार्फत आपणास दुष्काळाचे चित्र दिसेल.
गावात पाणी नसल्याने शेती तसेच सर्वच प्रकारची कामे ठप्प झाली आहेत. कर्ज घेवून पिकवलेली शेती पाण्याअभावी वाळून गेली. पिण्याच्या पाण्यासाठी ५ ते १० किमीची पायपीट करावी लागत आहे.
हिंगोलीत २७ गावांमध्ये ३० टँकर, नांदेडमध्ये १८८ गावे, १३८ वाड्यांसाठी ३१० टँकर, बीडमध्ये ६२१ गावे आणि ५३४ वाड्यांसाठी ८०० टँकर, लातूरमध्ये १९३ गावे, ४३ वाड्यांसाठी २६० टँकर, तर उस्मानाबादमध्ये २३८ गावे आणि १३ वाड्यांसाठी ३४० टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे.
दुष्काळ कोणालाही आवडत नाही. तो कोरडा असो वा ओला. या दोन्ही दुष्काळात शेतकरी पुरता नाडला जातो. हातातोंडाशी आलेले पीक हातातून गेल्यानंतर त्याच्या नशिबी येते ती हताशा. ती व्यक्त करण्याचे मार्ग मिळाले नाहीत.
आर्थिक मदत मिळाली नाही तर शेतकरी आत्महत्येचा मार्ग अवलंबतो. राज्यात गेल्या काही वर्षापासून हवामानावर आधारित शेतीची पार वाट लागलेली आहे