पुणे : औरंगाबाद-मराठवाडा साहित्य परिषदेचे ३८वे मराठवाडा साहित्य संमेलन अंजिठा लेणीच्या पायथ्याशी असलेल्या सोयगाव येथे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे. मसापच्या कार्यकारिणीच्या बैठकीत संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ विचारवंत व समकालीन मराठी साहित्याचे अभ्यासक डॉ. जनार्दन वाघमारे यांची निवड करण्यात आल्याची माहिती साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील यांनी दिली.या संमेलनाचे निमंत्रण अंजिठा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रंगनाथ काळे यांनी साहित्य परिषदेला दिले होते. साहित्य परिषदेने हे निमंत्रण स्वीकारले आहे. सोयगाव हे जगप्रसिद्ध अंजिठा लेण्यांच्या पायथ्याशी असून, लेणीपासून अवघ्या १२ कि. मी. अंतरावर आहे. सोयगावला १०० वर्षांहून जुनी नाट्य परंपरा आहे. मराठवाड्यातील श्रीराम संगीत नाटक मंडळी ही नाट्य जननी समजली जाते. या रंगभूमीचे प्रणेते नटवर्य लोटू पाटील यांनी स्वखर्चाने परदेशातून साहित्य मागवून येथे नाट्यगृहाची त्या काळात उभारणी केली. याच रंगभूमीवर बालगंधर्वचे समकालीन नानासाहेब पाठक, जयमाला शिलेदार, जयराम शिलेदार आणि इतर कलावंतांनी येथे तालमी केल्या आहेत. त्यामुळे या संमेलनानिमित्त अंजिठा लेणी आणि लेखक, कलावंतांना पाहण्याचा योग सहजच रसिक, प्रेक्षकांना प्राप्त होणार असल्याचे कौतिकराव ठाले-पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
मराठवाडा साहित्य संमेलन सोयगावला
By admin | Published: November 11, 2016 6:04 AM