पुणे : संपूर्ण जून महिन्यात वाट पाहायला लावणाऱ्या मॉन्सूनने अखेरच्या चार दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार हजेरी लावली़. कोकण, मुंबई, उत्तर महाराष्ट्रात कोकण, मध्य महाराष्ट्राला झोडपून काढले आहे़. मुंबई उपनगर, पालघरमध्ये सरासरीपेक्षा ७० टक्के अधिक पावसाची नोंद झाली असतानाच मराठवाडा अजूनही तहानलेला आहे़. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांपैकी तब्बल ६ जिल्ह्यांमध्ये पाऊस अतिशय कमी झाला असून हिंगोलीमध्ये तर सरासरीपेक्षा ५८ टक्के पाऊस कमी झाला आहे़. ‘वायु’चक्रीवादळामुळे जूनमधील मॉन्सूनचे आगमन लांबले़ पावसाळ्याच्या सुरुवातीला अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पामुळे कोकणासह मध्य महाराष्ट्रात पाऊस होतो़. पण, ‘वायु’ वादळामुळे हे सर्व बाष्प शोषले जाऊन सर्व पाऊस समुद्रात पडला़. त्यामुळे सर्व महाराष्ट्रात काळजीचे वातावरण निर्माण झाले होते़. पण जुनच्या अखेरच्या आठवड्यात मॉन्सूनची वाटचाल सुरु झाल्यानंतर राज्यात पाऊस परतला़. कोकण, उत्तर कोकणात त्याने कहर केला़. मात्र, घाटावरुन तो पुढे फारसा सरकला नाही़. त्यामुळे मध्य महाराष्ट्रातील सर्व धरणातील पाणीसाठ्यात अजूनही फारशी मोठी वाढ झाली नाही़ मॉन्सून कमकुवत असल्याचा सर्वाधिक फटका मराठवाड्याचा बसला आहे़. मुंबई व कोकण परिसरात मुसळधार पाऊस झाला़. मुंबईची तुंबई झाल्याची वर्णने ऐकल्याने राज्यात पाऊस झाला असल्याचा गैरसमज शहरी भागातील लोकांचा होण्याचा संभव आहे़. मात्र, तसे नाही़ प्रत्यक्षात काही जिल्ह्यांचा अपवाद वगळता राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये अजून जोरदार पावसाची आवश्यकता आहे़. मध्य महाराष्ट्रात अजूनही सरासरीपेक्षा १२ टक्के आणि विदर्भात सरासरीपेक्षा २५ टक्के कमी पाऊस झाला आहे़. मध्य महाराष्ट्रातील १० जिल्ह्यापैकी चार जिल्ह्यात २० टक्क्यांहून अधिक प्रमाणात पावसाची कमी आहे़. मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत सर्वात कमी पाऊस झाला असून तेथे सरासरीच्या केवळ ३५ टक्के पाऊस झाला आहे़. मध्य महाराष्ट्रात १६० मिमी पाऊस आतापर्यंत पडला आहे़ प्रत्यक्षात मध्य महाराष्ट्रात आतापर्यंत १८१़२ मिमी इतकी सरासरी आहे़. सरासरीपेक्षा १२ टक्के कमी पाऊस झाला आहे़. विदर्भातील ११ जिल्ह्यापैकी ७ जिल्ह्यात अत्यंत कमी पाऊस पडला आहे़. विदर्भात आतापर्यंतची पावसाची सरासरी १९६.२ मिमी असते़. पण प्रत्यक्षात १४७़.६ मिमी पाऊस झाला असून तो २५ टक्के कमी आहे.मराठवाड्यात विभागात १ जून ते ३ जुलैदरम्यान१५५.१मिमी सरासरी पाऊस पडतो़. मात्र, आतापर्यंत केवळ १०८.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे़. मराठवाड्यात सरासरीपेक्षा ३० टक्के पाऊस कमी झाला आहे़. पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने विदर्भात सर्वदूर पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता़. त्यामुळे तेथे सरासरीपर्यंत पावसाची शक्यता आहे़. मात्र, मराठवाड्यात जोरदार पावसासाठी आता पुन्हा मॉन्सूनचा जोर वाढल्यानंतर पाऊस होईल़. तोपर्यंत वाढ पहावी लागेल़.