पुणे : दक्षिण महाराष्ट्र ते केरळच्या किनाऱ्यालगत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे दक्षिण महाराष्ट्र, कोकण, कर्नाटक परिसरात पावसाचा जोर कायम आहे़ येत्या ४८ तासांत कोकणात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता वेधशाळेने व्यक्त केली आहे़ कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भातील बहुतांश धरणे भरत आली असताना मराठवाड्यात अजूनही पुरेसा पाऊस झालेला नाहीगेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस झाला़ मराठवाड्यात फारच तुरळक ठिकाणी पाऊस पडला़ गोव्यातील अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला़ महाड, फोंडा, लांजा, कुडाळ, वैभववाडी, चिपळूण, राजापूर, खालापूर, संगमेश्वर, देवरुख तसेच महाबळेश्वर येथे ४० मिमी पावसाची नोंद झाली़ गगनबावडा, माथेरान, सावंतवाडी, मालवण, दापोली, शाहुवाडी, आजरा येथे २० मिमी पाऊस झाला़ विदर्भातील कोची ५०, साकोली २० मिमी पावसाची नोंद झाली आहे़ घाटमाथ्यावर पाऊस सुरू असला तरी मराठवाड्यात मात्र अजूनही पाऊस नाही़ येत्या ४८ तासांत कोकण, गोव्यातील बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे़ पुणे व परिसरात हलक्या पावसाच्या एक-दोन सरी पडण्याची शक्यता आहे़
मराठवाडा अजूनही तहानलेला
By admin | Published: August 11, 2014 3:05 AM