मुंबई : मराठवाडा, विदर्भातील प्रकल्पांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. तसेच, अनुशेष भरून काढला जाईल. विदभार्साठी २६ टक्के, मराठवाड्यासाठी १८.७५ आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी ५५ टक्के निधी दिला असून, कोणावरही अन्याय केला नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानपरिषदेत सांगितले. यापुढे साखर कारखान्यांना हमी दिली जाणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी २६० अन्वये मांडलेल्या प्रस्तावावर राज्यातील प्रादेशिक असमतोल, मराठवाड्यातील नदीजोड प्रकल्प, पाणीप्रश्न, रस्ते, पर्यटन विकास आणि शेतकऱ्यांना पॅकेज, कृषी योजना, सहकार या प्रश्नांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सविस्तर उत्तर दिले. जरंडेश्वर साखर कारखान्यावरून होणाऱ्या आरोपांबद्दल पवार म्हणाले की, न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे या कारखान्याचा लिलाव केला गेला. मूळ किमतीपेक्षा अधिक किमतीने हा कारखाना विकला गेल्याचे पवार यांनी सांगितले. मात्र, यापुढे सरकारकडून साखर कारखान्यांना भागभांडवल दिले जाणार नाही आणि हमीही दिली जाणार नाही, असा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.यंदा उसाचे जास्त उत्पादन झाले आहे. पूर्ण गाळप होईपर्यंत कारखाने बंद करणार नाही. आवश्यकता भासल्यास शेतकऱ्यांसाठी विशेष अनुदानाचे निर्णय घेतले जातील, असेही ते म्हणाले.
मराठवाडा, विदर्भाला निधी कमी पडू दिला जाणार नाही- अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 8:11 AM