मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शंका उपस्थित केलेली मराठवाडा वॉटरग्रीड योजना अद्याप रद्द झाली नसल्याचे स्पष्टीकरण सार्वजनिक बांधकामंत्री आणि मराठवाड्याचे नेते अशोक चव्हाण यांनी दिले. मराठवाडा वॉटरग्रीड योजनेसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीनंतर चव्हाण यांनी ही माहिती दिली.
मराठवाडा वॉटरग्रीड योजनेचा पिण्याच्या पाण्यासाठी कसा उपयोग होईल, यावर बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. मराठवाड्यातील 11 पैकी निम्मी धरणे तुटीची आहेत. या तुटीच्या धरणातील पाण्याची उपलब्धता कशी वाढवता येईल यावर बैठकीत प्रामुख्याने चर्चा झाल्याचे चव्हाण यांनी सांगितले. यावेळी मराठवाड्यातील सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.
कोकणातील समुद्रात वाहून जाणारे पाणी जायकवाडी प्रकल्पात वळविण्यासंदर्भात सर्वपक्षीय नेत्यांनी चर्चा केल्याचे ते म्हणाले. गेल्या महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठवाड्यात बैठक घेतली होती. त्यावेळी त्यांनी या योजनेत तांत्रिक त्रुटी असल्याचे म्हटले होते. मात्र योजनेसंदर्भातील अंतिम निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात येणार असल्याचे चव्हाण म्हणाले.
मराठवाडा वॉटरग्रीड योजना देवेंद्र फडणवीस यांच्या काळात आणण्यात आली आहे. मात्र महाविकास आघाडीकडून या योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्यावरून विरोधकांनी टीका केली होती. तर माजी पाणीपुरवठामंत्री आणि भाजपनेते बबनराव लोणीकर यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.