औरंगाबाद : मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून १७२ दलघमी म्हणजे ७ टीएमसी पाणी सोडण्यावर तीन दिवसांत निर्णय घेतला जाणार आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळात सोमवारी झालेल्या बैठकीत अहमदनगर जिल्ह्यातील शेतकºयांनी जायकवाडीत पाणी सोडण्यास विरोध दर्शविला.
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अजय कोहिरकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी अहमदनगर, नाशिक, गंगापूर आणि जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या प्रमुख प्रशासकीय अधिकाºयांची बैठक झाली. त्यात मुळा, भंडारदरा, दारणा धरणांतील पाणीसाठ्याचा आढावा घेण्यात आला.
जायकवाडी धरणात १७२ दलघमी म्हणजे ७ टीएमसी एवढ्या पाण्याची तूट असल्याचे समोर आले.
नाशिक, नगर विरुद्ध मराठवाडा संघर्ष?२०१२ पासून अहमदनगर, नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून पाणी नेले जाते. हा नगर, नाशिक जिल्ह्यांवर अन्याय असल्याचे नगरच्या शेतकºयांनी सांगितले. लेखी हरकतीबाबतची जनसुनावणी घेतल्यानंतरच समन्यायी पाणी वाटपाच्या कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी त्यांनी केली.