मुंबई : अॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करा, या मागणीसाठी राज्यातील दलित, आदिवासी, मुस्लीम, भटके आणि विमुक्तांचा राज्यव्यापी मोर्चा १४ मार्चला मुंबईत धडकणार आहे. या मोर्चात सर्वपक्षीय नेते सामील होणार असल्याची माहिती रिपब्लिकन सेनेचे आनंदरराज आंबेडकर यांनी दिली. बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.आंबेडकर म्हणाले की, ‘बहुजन हक्क संवर्धन विराट मोर्चा’ या नावाखाली सर्व दलित, आदिवासी, ओबीसी, भटके-विमुक्त आणि अल्पसंख्याक या मोर्चात सामील होणार आहेत. संविधानाने दिलेल्या सामाजिक न्याय आणि हक्कांचे संवर्धन व्हावे, हा एकमेव हेतू त्यात आहे. मराठा क्रांती मूकमोर्चामुळे राज्यातील या बहुजनांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यामुळे या मोर्चातून बहुजनांना सरकारने दिलासा देण्याची मागणी करण्यात येणार आहे. माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे म्हणाले की, मुळात मराठा समाजाविरोधात किंवा मराठा आरक्षणाविरोधात हा मोर्चा नसेल. मात्र, मराठा समाजाला आरक्षण देताना सरकारने इतर मागासवर्गीय जातीच्या आरक्षणाला हात लावू नये, अशी सरळ मागणी मोर्चातून केली जाईल. कोणत्या मार्गाने आणि किती वाजता मोर्चा निघेल, याबाबत लवकरच माहिती देण्यात येईल. मात्र, संपूर्ण मोर्चा मूक स्वरूपाचा असून कोणताही कार्यकर्ता यामध्ये घोषणा देणार नाही. (प्रतिनिधी)>मोर्चात सामील होणारे मान्यवर!केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जोगेंद्र कवाडे, काँग्रेसचे माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, आमदार भाई गिरकर, रिपाइंचे अविनाश महातेकर, नानासाहेब इंदिसे, अर्जुन डांगळे, आमदार हरिभाऊ राठोड, नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणे आणि उपमहापौर अविनाश लाड, माजी आयपीएस अधिकारी वाय. सी. पवार, उचल्याकार लक्ष्मण गायकवाड, अखिल भारतीय मातंग संघाच्या कुसुमताई गायकवाड, शिवसेनेचे माजी आमदार बाबुराव माने, असे विविध समाजाचे, पक्षांचे आणि संघटनांचे प्रतिनिधित्त्व करणारे नेते या वेळी सामील होणार आहेत.
मुंबईत १४ मार्चला ‘बहुजन मोर्चा’
By admin | Published: January 19, 2017 6:01 AM