दीपक भातुसे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: आर्थिक वर्ष ३१ मार्च रोजी संपत असून आता केवळ तीन दिवस निधी खर्च करण्यासाठी आणि प्रलंबित देयके (बिले) अदा करण्यासाठी हातात आहेत. त्यातही हे तीनही दिवस सुट्टीचे आहेत. मात्र वर्षअखेर लक्षात घेता मंत्रालयातील अनेक विभागांनी गुढीपाडव्याचा ३० मार्चचा दिवस वगळता शनिवार २९ मार्च आणि रमजानची सुटी असलेला सोमवार ३१ मार्च हे दोन दिवस काम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. यातही वित्त विभागासाठी उरलेले दोन दिवस हे अत्यंत घाईगडबडीचे असणार आहेत.
विविध विभागांनी आतापर्यंत ६१.९० टक्के निधी खर्च केला आहे. यात सर्वाधिक खर्च मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबविणाऱ्या महिला व बालविकास विभागाने केला आहे. उरलेल्या दोन दिवसांत जास्तीत जास्त निधी खर्च करणे, जास्तीत जास्त देयके अदा करण्यावर विविध विभागांचा भर असेल. यासाठी रात्री उशिरापर्यंत मंत्रालयातील कार्यालये सुरू राहतील. मंत्रालयात दरवर्षीच आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवसांमध्ये देयके वा निधीकरिता गर्दी होत असते. शेवटच्या दिवशी वित्त विभागात अधिकारी देयके आणि निधीसाठी येत असल्याने वित्त विभागात उभे राहायला जागा नसते.
...अन्यथा निधी तिजोरीत
विविध विभागांचे अधिकारी तसेच विविध विभागांत देयके प्रलंबित असलेले कंत्राटदारही मंत्रालयात गर्दी करतात. असेच चित्र मंत्रालयात आहे. अर्थसंकल्पात विविध विभागांसाठी आर्थिक तरतूद केली जाते. हा निधी आर्थिक वर्षात खर्च करावा लागतो अन्यथा तो अखर्चित निधी म्हणून तिजोरीत वर्ग केला जातो. हे टाळण्यासाठी मार्च महिन्यात निधीचे वाटप केले जाते.